गुंडेगाव परिसरात मुसळधार; शाळांना सुटी | पुढारी

गुंडेगाव परिसरात मुसळधार; शाळांना सुटी

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून, या मुसळधार पावसामुळे दोन हजार 800 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोयाबीनसह उडीद, मका, कांदा पिकालाही फटका बसला. गावातील जनावरे दगावली असून, शेती, घरांचेही मोठे नुकसान झाले. या पावसाने गावातील जनजीवन विस्कळीत झाले. पूरपरिस्थितीमुळे मंगळवारी (दि.27) शाळांना सुटी देण्यात आली. वाळकी मंडळात 23.3 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, गुंडेगावात मोठा पाऊस झाला आहे.

गुंडेगाव परिसरात 25 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे नदी काठावरील शेतकर्‍यांची शेती वाहून गेली. गुंडेगावमधील हराळमळा, कुताळमळा पाझर तलाव परिसरात पावसाचे प्रमाण अधिक राहिले. पिकांवरही हा पाऊस तुटून पडल्याने शेतांमध्ये पाणी साचले. त्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती गुंडेगावचे उपसरपंच संतोष भापकर यांनी दिली. गावातील दोन हजार 800 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने अंदाज वर्तविला आहे. अतिवृष्टीचा फटका पिकांना सर्वाधिक फटका बसला असून, सुमारे एक हजार सहाशे शेतकर्‍यांचे नुकसान झाले.

सोयाबीन, कापसाचे नुकसान
परिसरात कांदा, कापूस, सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, कांदा सर्वाधिक नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेली पिके पाण्याखाली गेले. घरांची पडझड झाली असून, संतोष भापकर, पोपट भापकर, बबनराव हराळ, सागर कासार, ऋषिकेश भापकर, बबन हराळ, प्रमोद पवार, उत्तमराव भापकर, बाळासाहेब भापकर, युवराज पाटील, महेश भोसलेसह अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले. फळंबाग शेतकरी रंगनाथ भापकर, गजानन भापकर, प्रशांत कुताळ, पोपट केरू भापकर , बाळासाहेब भापकर यांच्या फळबागांचे नुकसान झाले.

पंचनामे करण्याची हराळ यांची मागणी
गुंडेगावातील पावसामुळे शेती,घर, गोठ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची मंगळवारी तहसीलदार उमेश पाटील, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खरात आदींनी पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य बाळासाहेब हराळ यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली.

 नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश
गुंडेगाव येथील लागवडी खालील क्षेत्रापैकी 85 टक्के पिकांचे नुकसान झाले असून, पेरणीसाठी केलेला खर्चही शेतकर्‍यांच्या पदरात पडणार नाही, अशी परिस्थिती आहे. स्थानिक प्रशासनाने पावसामुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांना दिले आहेत. गुंडेगाव येथे पंचनामे करण्यासाठी हराळमळा परिसरात तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी ग्रामसेवक अशोक जगदाळे, मंडळ कृषी अधिकारी नारायण कारंडे, तलाठी पांडुरंग कोतकर आदींची संयुक्त बैठक घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Back to top button