नगर : दोन अभियंत्यांची महिनाभरात उचलबांगडी | पुढारी

नगर : दोन अभियंत्यांची महिनाभरात उचलबांगडी

नगर : पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशनला गती देण्यासाठी जिल्हा परिषद सीईओ आशिष येरेकर यांनी पाणी पुरवठ्याचे तत्कालिन कार्यकारी अभियत्यांची तडकाफडकी बदली केलेल्या महिना उलटत नाही, तोच पुन्हा सोमवारी तेथे नियुक्त केलेल्या दुसर्‍या कार्यकारी अभियंत्यांचीही सीईओंनी उचलबांगडी केली. दरम्यान राहुरी-संगमनेरचे उपअभियंता एस.एस.गडदे यांच्याकडे पाणी पुरवठ्याचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. महिनाभरात तिसरे कार्यकारी अभियंता आल्याने पाणी पुरवठा विभागातील कर्मचारीही गोंधळून गेले आहेत.

जिल्हा परिषदेत जलजीवन मिशन राबविण्यासाठी कायमस्वरुपी कार्यकारी अभियंता नसल्याने ‘प्रभारी’ अधिकार्‍यावर भार टाकला जातो. नेवाश्याचे आनंद रुपनर यांच्याकडील प्रभारी पदभार महिनाभरापूर्वीच सीईओंनी बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण जोशी यांच्याकडे देत रुपनर यांची मूळ जागी बदली केली. सोमवारी सीईओंनी पुन्हा जोशी यांनाही तडकाफडकी मूळ जागी धाडले. जोशी यांचा पुरवठ्याचा ‘कार्यकारी अभियंता’ पदभार संगमनेर-राहुरीचे शाखा अभियंता गडदे यांच्याकडे देण्यात आला आहे.

ते पदभार स्वीकारण्यासाठी मंगळवारी येण्यापूर्वीच संगमनेर व राहुरीचे ठेकेदार त्यांच्या दालनात पुष्पगुच्छ घेवून उपस्थित असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ‘कोल्हार-चिंचोली’सह अन्य योजनांच्या कामांमुळे गडदे चर्चेत आहेत. लवकरच सीईओंना पुन्हा नवीन कार्यकारी अभियंता शोधावा लागणार का? अशी शंका उपस्थित होत आहे.

रुपनर, जोशींना ‘कर्जत-जामखेड’ भोवले?
जलजीवन ही केंद्र व राज्याची संयुक्त योजना आहे. ही कामे देताना राजकीय दबावतंत्राचा वापर होतो, अशी चर्चा आहे. महिनाभरापूर्वी रुपनर यांची तडकाफडकी बदली आणि बल्लाळ नावाच्या कर्मचार्‍यावर झालेल्या निलंबनालाही भाजप-राष्ट्रवादीच्या दोन आमदारांच्या संघर्षाची किनार असल्याची चर्चा आहे. जोशी यांच्या बदलीमागेही कर्जत-जामखेडची एक फाईलच कारणीभूत असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे.

Back to top button