नगर : लम्पी पशुधनांसाठी विलगीकरण केंद्र | पुढारी

नगर : लम्पी पशुधनांसाठी विलगीकरण केंद्र

नगर : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथील बळीराजा फाऊंडेशनला लम्पी चर्मरोग बाधित पशुधनांसाठी स्वखर्चाने विलगीकरण केंद्र सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली आहे. लम्पी चर्मरोग बाधित जनावरे सांभाळणे शेतकर्‍यांना जिकरीचे होत आहे. त्यामुळे काही शेतकरी बाधित जनावरे सोडून देत आहेत. या बाधित जनावरांमुळे लम्पीचा अधिक प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाधित जनावरांसाठी कोणती सामाजिक संस्था पुढे येत असल्यास सुरु करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली होती. तसेच राज्याचे महसूल मंत्री तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लक्ष वेधले होते.

लम्पी चर्मरोगाचा प्रसार रोखण्यासाठी
जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना सुरु आहेत. बाधित जनावरांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बळीराजा फाऊंडेशन या संस्थेला विलगीकरण केंद्र सुरु करण्यास मान्यता दिली आहे. प्राण्यांमधील संक्रमिकता व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रणअधिनियम 2009 मधील अटीनुसार मान्यता देण्यात आली आहे.

हे केंद्र फक्त जिल्ह्यात बाधित जनावरांसाठी असणार आहे. या केंद्रात इतर जिल्ह्यातील जनावरे दाखल करण्यास मनाई असणार आहे. जनावरे बाधित असल्याचे प्रमाणपत्र पशुधन विकास अधिकारी यांनी दिल्यानंतरच त्यांना प्रवेश द्यावा, दाखल जनावरांची माहिती तलाठी, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांना देणे संस्थेला बंधनकारक केले आहे.एकूण 26 अटी व शर्तीची पुर्तता केल्यानंतरच हे केंद्र सुरु करावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Back to top button