

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या वतीने जिल्ह्यात आपदा मित्र योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी 500 स्वयंसेवकांची आपदा मित्र म्हणून निवड केली जाणार आहे. आपदा मित्र योजनेच्या माध्यमातून आपत्कालीन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी आपदा मित्रांना 8 ते 10 दिवसांचे निवासी आपत्कालीन प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षित आपदा मित्रांना ओळखपत्र, गणवेश तसेच आपत्कालीन प्रतिसाद किट देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे केले आहे.
यासाठी उमेदवार 18 ते 40 वयोगटातील असावा. माजी सैनिक, सेवानिवृत्त वैद्यकीय व्यावसायिक, स्थापत्य अभियंते यांना वयाचा निकष शिथिल केला जाऊ शकतो. उमेदवार जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असावा, तो किमान सातवी पास असावा, त्याचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे. याशिवाय आधार कार्ड असणे आवश्यक असून, आपत्ती प्रतिसाद कार्यात स्वयंसेवा करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून, महिलांचा पंचवीस टक्के सहभाग असावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी केले आहे.