करंजी : भगरीच्या पिठातून 15 जणांना विषबाधा | पुढारी

करंजी : भगरीच्या पिठातून 15 जणांना विषबाधा

करंजी : पुढारी वृत्तसेवा  : नवरात्रीच्या उपवासात खालेल्या भगरीच्या भाकरीतून करंजीसह लगतच्या गावातील पंधरा जणांना विषबाधा झाली. सोमवारी रात्री विषबाधेचा हा प्रकार घडला. गावातीलच किराणा दुकानातून भगरीचे पीठ खरेदी करण्यात आल्याचे सांगत त्यातूनच विषबाधा झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान ज्या-ज्या लोकांनी या दुकानातून पीठ खरेदी केले त्यांनाही त्रास होत असल्याचे समजते. करंजी येथील प्रकाश गोवर्धन राठोड, लिलाबाई लक्ष्मण चव्हाण, अनिता प्रकाश राठोड, रामदास रावजी चव्हाण, गीताबाई रामदास चव्हाण, अशोक तारू चव्हाण, सुशीला अशोक चव्हाण, रमेश संतोष चव्हाण या आठ जणांवर तिसगाव येथील श्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

करंजीसह परिसरातील अनेक महिला पुरुषांनी नवरात्रीचे उपवास धरले आहेत. उपवासाच्या पहिल्याच दिवशी गावातील काही महिलांनी करंजी येथील एका किराणा दुकानातून भगरीचे पीठ आणले. रात्री या पिठापासून भाकरी तयार केल्या. या भाकरी खाल्ल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास काही लोकांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागला. घरातील इतरांनी त्यांना तात्काळ तिसगाव येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. भगरीच्या पिठामुळे करंजीसह परिसरातील खंडोबावाडी,मराठवाडी येथील काही लोकांना त्रास झाला असून नगर येथील खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.

अन्नातून विषबाधेमुळे सोमवारी रात्री करंजीच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दोन दिवसात त्यांना डीस्चार्ज दिला जाईल.
                                                – डॉ. गणेश साळुंखे,  डॉ. वैशाली क्षीरसागर

संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी
करंजीतील जवळपास 15 लोकांना भगरीच्या भाकरीतून विषबाधा झाली आहे. हे पीठ तयार करणार्‍या कंपनीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करून रुग्णांना न्याय द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश शेलार, छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे, माजी सरपंच भाऊसाहेब क्षेत्रे, राजेंद्र क्षेत्रे, पै. नामदेव मुखेकर, माजी चेअरमन उत्तम अकोलकर, संभाजी ब्रिगेडचे सुभाष अकोलकर यांनी केली.

Back to top button