नगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी | पुढारी

नगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

नगर; पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम. ए. बरालिया यांच्या न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आकाश बबन शिरसाठ (वय 20, रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, जि. नगर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने दि.1 जुलै 2015 रोजी आरोपी आकाश बबन शिरसाठ याने लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीला पळवून नेल्याबाबतची फिर्याद राहुरी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान, पोलिसांना दि. 31 जुलै 2015 रोजी पीडिता ही आरोपीसोबत इंदापूर येथे मिळून आली.

आकाश बबन शिरसाठ याचे लग्न झालेले असताना, त्याने लग्नाचे आमिष दाखवून आपल्याला पळवून नेल्याचा जबाब पीडितेने पोलिसांना दिला. तसेच, आरोपीने इंदापूर येथे एका भाड्याच्या खोलीत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.  या जबाबावरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक सी. आर. गावंडे यांनी पूर्ण करून न्यायालयामध्ये आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाचा युक्तिवाद व न्यायालयासमोर आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी आकाश बबन शिरसाठ याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल डहारे, के. एन. पारखे, संजय पठारे, रमेश शिंदे यांनी सहकार्य केले.

 

Back to top button