अगस्ती सहकारी साखर कारखाना संचालक निवडणुकीत सत्तांतर | पुढारी

अगस्ती सहकारी साखर कारखाना संचालक निवडणुकीत सत्तांतर

अकोले; पुढारी वृत्तसेवा: अगस्ती सहकारी साखर कारखाना संचालक निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड, आ. वैभव पिचड यांना सभासदांनी घरचा रस्ता दाखविला. सत्तांतराचा कौल देत सभासदांनी पिचडांची 29 वर्षाची सत्ता खालसा केली. राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे, सीताराम गायकर यांच्यावर सभासदांनी विश्वास टाकत कारखान्याची सत्ता सोपविली.

संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व 21 जागा आ. लहामटे-गायकर यांच्या शेतकरी समृध्दी मंडळाने जिंकल्या. पिचड यांच्या शेतकरी मंडळास खातेही उघडता आले नाही. या निवडणुकीत पिचड-पुत्रांच्या शेतकरी विकास मंडळाचा सभासद मतदारांनी सुपडा साफ केला. या निवडणुकीत मतदारांनी माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड दोघांनीही नाकारत त्यांचा पराभव केला.

अकोले अगस्ती सहकारी साखर कारखाना संचालक निवडणुकीत आ.डॉ.किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, कॉ. डॉ. अजित नवले, काँग्रेसचे मधुभाऊ नवले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती कैलास वाकचौरे, रिपब्लिक पार्टीचे विजयराव वाकचौरे, शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ, माजी उपसभापती मारूती मेेंंगाळ या महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकत्र येत पिचडांची सत्ता घालविली. आमदार किरण लहामटे यांचे वडील यमाजी लहामटे यांना सर्वाधिख 4 हजार 465 सर्वाधिक मते मिळाली आहेत.

अशोकराव भांगरे, सीताराम पाटील गायकर, डॉ. अजित नवले, विजयराव वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळाला. त्यांनी इंग्रजी नीतीने राजकारण केले, पण मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
                                                       – डॉ. किरण लहामटे, आमदार

तालुक्याची भाग्यलक्ष्मी अगस्ती साखर कारखाना समर्थपणे चालवू या शेतकरी समृध्दी मंडळाच्या विश्वासत्मक आवाहनाला सभासद मतदारांनी कौल दिला. मतदारांनी एकहाती सत्ता ताब्यात दिली. त्यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. कारखाना सक्षमपणे चालवून दाखविणार.
                                              – सीताराम गायकर, माजी उपाध्यक्ष.

कारखाना निवडणुकीत शेंडी मतदार केंद्रावर मृत महिलेच्या नावावर बोगस मतदान करण्यात आल्याने प्रशासन झुकल्याचे दिसून आले. याबाबत शासनाकडे कारवाईची मागणी करणार असून न्यायालयात दाद मागणार आहे. अलीबाबाच्या खजिन्यापुढे आम्ही कमी पडलो. दडलेला खजिना निवडणुकीत बाहेर पडला.

                                                           -वैभव पिचड, माजी आमदार

विजयी उमेदवार व मते
बिगर उत्पादक, पणन संस्था प्रतिनिधी गट : सीताराम पाटील गायकर,
आगर गट: अशोक आरोटे (4414), परबत नाईकवाडी (4414), विकास शेटे (4138).
इंदोरी गट: अशोक देशमुख (4110), पाटीलबा सावंत (3991), प्रदिप हासे (3968).
अकोले गट : मच्छिंद्र धुमाळ (4253), विक्रम नवले (4219), कैलासराव वाकचौरे (4286).
कोतुळ गट : मनोज देशमुख (4306), यमाजी लहामटे (4465), कैलास शेळके (4353).
देवठाण गट : बादशहा बोंबले (4144), रामनाथ बापू वाकचौरे (41970), सुधीर शेळके (4007).
महिला राखीव : सुलोचना नवले (4546), शांताबाई वाकचौरे (4222).
इतर मागासवर्गीय गट: मीनानाथ पांडे (4283).
अनुसूचित जाती जमाती गट: अशोकर यशवंत भांगरे (4214).
भटक्या विमुक्त जाती गट : सचिन दराडे (4473).

Back to top button