नगर : मुले पळविणार्‍या टोळीची अफवाच ! | पुढारी

नगर : मुले पळविणार्‍या टोळीची अफवाच !

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याचे मेसेज, व्हिडिओ सोशल मीडियावर खोडसाळपणे पसरविले जात असून, ही केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा पोलिस दलाकडून देण्यात आले आहे. असा कोणताही प्रकार जिल्ह्यात नसून, यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आले आहे. सोशल मीडियाद्वारे जिल्ह्यात लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याचे मेसेज काही दिवसांपासून व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहेे.

त्यामुळे जिल्हा पोलिस दलाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जिल्ह्यात अशी घटना कोठेही घडली नसून, लहान मुलांना पळवून नेण्याची केवळ अफवा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच, शहरासह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांअंतर्गत पोलिसांची दिवसरात्र पेट्रोलिंग सुरू आहे. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, कोणीही सोशल मीडियावर आलेले चुकीचे मेसेज खातरजमा न करता पुढे पाठवू नयेत, शंका असल्यास जवळील पोलिस ठाण्यात संपर्क करावा.

संशय आल्यास डायल करा 112 नंबर
काही टोळ्या मुलांना उचलून नेत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, कोणतीही संशयित व्यक्ती आपल्या परिसरात आढळून आल्यास पोलिस दलाच्या 112 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा.

सोशल मीडियावर लहान मुले पळविणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्य नसून, ती अफवा आहे. त्यामुळे काही संशय आल्यास पोलिस दलाच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा.
मनोज पाटील,
                                                              -जिल्हा पोलिस अधीक्षक, नगर

Back to top button