हातगावात चोरट्यांचा धुमाकूळ, महिला, वृद्धांना शस्त्राने मारहाण | पुढारी

हातगावात चोरट्यांचा धुमाकूळ, महिला, वृद्धांना शस्त्राने मारहाण

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा :  शेवगाव तालुक्यातील बोधेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील हातगाव येथील धनाजी मातंग आणि पटेल शेख यांच्या वस्त्यांवरील चोरट्यांनी महिलांना व वृद्धांना मारहाण करून सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोकड, शेळया, कोंबड्या असा लाखाच्या वर ऐवज लुटून चोरटे पसार झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. बोधेगावच्या उत्तरेला बोधेगाव-हातगाव म्हणजेच पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गालगत असणार्‍या मातंग आणि शेख वस्त्यांवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला. रात्री दोनच्या सुमारास चोरटे पटेल जैनुद्दिन शेख (वय 65) यांच्या वस्तीवर आले. त्यांनी सर्वप्रथम लिंबाच्या झाडाला टांगलेला विजेचा बल्ब काढला.

सगळीकडे अंधार झाल्यावर त्यांनी पटेल शेख यांना मारहाण करून पैशाची मागणी केली. त्याच्याकडे काहीच न मिळाल्याने त्यांच्या दोन शेळ्या कोंबड्या घेऊन पोबारा केला. जाताना चोरट्यांनी शेख यांना बांधून टाकले. त्यानंतर रोडच्या समोरच्या बाजूला असणार्‍या धनाजी कडूबा मातंग (वय 55) यांच्या वस्तीवर चोटयांनी आपला मोर्चा वळविला. या वस्तीवर धनाजी मातंग त्यांची पत्नी कांताबाई, मुलगा किशोर आणि सून यांना चोरट्यांनी जबर मारहाण करून महिलांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागीन आणी रोख रक्कम 30 हजार रुपये घेऊन चोरटे पळून गेले.

महिला व वृद्धांना चोरट्यांनी लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यांच्याकडे कोयता, चाकू, लोखंडी गज अशी हत्यारे होती. त्यांनी दहशत निर्माण करून सर्वांचे मोबाईल जमा करून बंद केले. पटेल शेख यांच्या वस्तीवर चोरटे दारू पिले या ठिकाणी देशी दारुचा रिकाम्या बाटल्या सापडल्या. चोरटे मराठी, हिंदीमधे बोलत होते. साधारण 3 0 वयोगटातील असून त्यांचाकडे तवेरा गाडी होती असे वस्तीवरील नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, मातंग वस्तीवरील किशोर मातंग यांनी सकाळी सात वाजता हातगावचे सरपंच अरुण मातंग यांना आणि बोधेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. सकाळी सहा वाजता अरुण मातंग यांनी वस्तीवर जाऊन जखमींना दवाखान्या हालवले तसेच त्यांना धीर दिला. साडेसातच्या दरम्यान बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे सहायक फौजदार भगवान वढदे, पो.कॉ. संतोष धोत्रे घटनास्थळी दाखल झाले. दुपारी शेवगावचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे ठसे तज्ज्ञांना बोलविण्यात आले होते. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

Back to top button