कर्मचार्‍यांचे पगार थकले; मिरी-तिसगाव योजना बंद | पुढारी

कर्मचार्‍यांचे पगार थकले; मिरी-तिसगाव योजना बंद

करंजी : पुढारी वृत्तसेवा : कर्मचार्‍यांचे चार महिन्यांचे पगार थकल्यानेे पाथर्डी व नगर तालुक्यातील 33 गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेली मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजना पंधरा दिवसापासून बंद आहे. त्यामुळे अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्काळ या कर्मचार्‍यांच्या पगाराची व्यवस्था करून ही नळ योजना पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी माजी सभापती संभाजी पालवे यांनी केली आहे. पावसाळ्यामध्ये या योजनेच्या पाण्याची काही लाभधारक गावांना गरज भासत नसली तरी देखील त्यांनी या योजनेची पाणीपट्टी भरण्यास सहकार्य केले पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक लाभधारक गावाने प्राधान्याने या योजनेचे पाणी घेतले पाहिजे. तरच ही योजना सुरळीत चालू शकते. कर्मचार्‍यांचे पगार थकल्यामुळे योजना बंद करण्याची वेळ आल्याने, लाभधारक गावांना पंधरा-वीस दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे तात्काळ संबंधित कर्मचार्‍यांचे पगार करून ही योजना पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी पालवे यांनी केली आहे.

पाणीपट्टी वसुलीत अडथळे
लाभार्थी 33 गावांपैकी केवळ बारा गावेच पाणी घेत आहेत. त्यामुळे पाणीपट्टी वसूल करण्यास अडथळे येत आहेत. पावसाळ्यात खर्च जादा आणि वसुली कमी, अशी परिस्थिती निर्माण होते. लवकरच पाणीपट्टी वसूल करून दोन-चार दिवसांत कर्मचार्‍यांचे पगार देण्याची व्यवस्था करू, असे पाणी योजनेचे सचिव भाऊसाहेब सावंत यांनी सांगितले.

Back to top button