अकोले : बोगस मतदान केल्यावरून दोन्ही गटात राडा, मधुकर पिचड यांचे ठिय्या आंदोलन | पुढारी

अकोले : बोगस मतदान केल्यावरून दोन्ही गटात राडा, मधुकर पिचड यांचे ठिय्या आंदोलन

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूक मतदान प्रकिया सुरु असतानाच शेवटच्या टप्प्यात शेंडी (भंडारदरा) केंदावर मयत महिलेच्या नावावर बोगस मतदान केल्यावरून राडा झाला. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले, तर माजी आमदार वैभव पिचड व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, जिल्हा बँकचे संचालक अमित भांगरे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मात्र, राजूर पोलिसांनी दोन्ही गटांना शांत केले. मात्र, त्यानंतरही दोन्ही गटांत घोषणाबाजी सुरू होती.

निवडणूक प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात शेंडी मतदान केंद्रावर चंद्राबाई डामसे या मयत महिलेच्या नावावर बोगस मतदान केल्याची घटना शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकार्‍याला बोगस मतदानाबाबत जाब विचारत कारवाईची मागणी केली. त्यानंतर अशोक भांगरे, अमित भांगरे, सरपंच दिलीप भांगरे, तसेच मधुकर पिचड, वैभव पिचड यांनी कार्यकर्त्यांसह मतदान केंद्रावर धाव घेतली. वैभव पिचड यांनी संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारत बोगस मतदान करणार्‍या व जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. शेंडी मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया स्थगित करून फेरमतदान घेण्याची मागणी करत वैभव पिचड यांनी ठिय्या आंदोलन केले. तर, बोगस मतदानावरून भांगरे व पिचड गटात एकमेकांवर धावून जात शाब्दिक खडाजंगी झाली.

संबधितांवर कारवाई करतो. परंतु, शांततेत मतदान करण्याची भूमिका घेत सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी वातावरण शांत केले. त्यानंतर भांगरे पिता पुत्र कार्यकर्त्यांसह मतदान केंद्राबाहेर गेले. शेंडी मतदान केंद्रावर बोगस मतदान करणारे व जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करणार असल्याचे निवडणूक अधिकारी जी. जी. पुरी यांनी सांगितले. त्यानंतर प्रशासनाने मतदान प्रक्रिया पूर्ण करून मतपेट्या पोलिस बंदोबस्तात अकोल्याकडे वाहनाने रवाना केल्या. शेंडी मतदार केंद्रावर बोगस मतदान करणार्‍यावर राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.

फेरमतदानाची मागणी अयोग्य : आ.लहामटे
बोगस मतदान करणार्‍यावर कारवाई झाली पाहिजे. शेतकरी समृद्धी मंडळाला बहुमत मिळणार असल्याने शेतकरी विकास मंडळाचे पिचड यांची फेरमतदान घेण्याची केलेली मागणी योग्य नाही. कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार निंदणीय आहे. दहशतवाद अकोले तालुका सहन करणार नाही, असे आ.डॉ. किरण लहामटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

..पण मतदान करू द्या : भांगरे
अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान करणार्‍याबाबत सीसीटीव्ही चेक करा, पोलिस केस करा,अधिकार्‍यांवर कारवाई करा. पण, मतदारांना शांततेत मतदान करू द्या, असे आवाहन आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे व जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांनी केले.

संबंधितांवर कारवाई करा : पिचड
बोगस मतदानाची घटना घडल्याने आम्हाला सर्वांना अटक करा. मग मतदान करा, अशी भूमिका मधुकर पिचड यांनी घेत फेरमतदानाची मागणी करीत मतदान केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन केले. मतदान केंद्रावर बोगस मतदान होईल, असा अर्ज देऊनही बोगस मतदान झाल्याने संबंधितावर कारवाईची मागणी पिचड यांनी केली आहे.

Back to top button