प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यास, विमा कंपनीला 72 तासांच्या आत माहिती द्यावी | पुढारी

प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यास, विमा कंपनीला 72 तासांच्या आत माहिती द्यावी

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 61 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या आपत्तीमध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यास, त्यांनी 72 तासांच्या आत पीक विमा कंपनीस कळवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवाजी जगताप यांनी केले. नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये, यासाठी शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकारी अथवा कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील त्यांनी केले. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर 2022 या कालावधीत 518.16 मि.मि. म्हणजेच 115.63 टक्के पाऊस झाला. प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम-2022 मध्ये सहभागी झालेल्या शेतकर्‍यांच्या पीकविमा कंपनीकडे तक्रारी प्राप्त होत आहेत.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पिकाचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांनी नुकसानीची पूर्वसूचना घटना घडल्यानंतर 72 तासाचे आत विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम सन 2022 साठी अहमदनगर जिल्हयासाठी एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स या कंपनीची नियुक्ती केली आहे. शेतकर्‍यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीची पूर्व सूचना देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

एचडीएफसी इर्गो पिक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक 1800 2660700 आहे. याशिवाय विमा कंपनीचे तालुकास्तरीय प्रतिनिधी, तसेच तालुका कृषी अधिकारी यांना कार्यालयात प्रत्यक्ष भेटून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती देता येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप यांनी यावेळी सांगितले.

Back to top button