मॉल संस्कृती विदेशी; वाईनला विरोधच : अण्णा हजारे | पुढारी

मॉल संस्कृती विदेशी; वाईनला विरोधच : अण्णा हजारे

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी पुण्यात बोलताना पुन्हा मॉलमध्ये वाईन विक्री सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. मॉल संस्कृती ही भारतीय नाही, तर ती विदेशी संस्कृती असल्याची प्रतिक्रिया देत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला इशारा दिला आहे. शिंदे-फडणवीस सरकार ’मॉलमध्ये वाईन (दारु) विक्रीचा निर्णय घेतील असं मला वाटत नाही. पण तसं झालं तर नाइलाजास्तव आम्हाला आमच्या मार्गानं जावं लागेल” असा इशाराही अण्णांनी दिला आहे. महाविकास आघाडी सरकारनं मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जनतेच्या आणि भाजपाच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा मॉलमध्ये वाईन विक्री सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

मॉलमधील वाईन विक्री ही शेतकर्‍यांच्या हिताची असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची महिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. मॉलमधील वाईन विक्री ही राज्याच्या आणि शेतकर्‍याचा हिताची आहे, असे मत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं होतं. मॉलमध्ये वाईन विक्री करावी की नको, यासाठी मागील सरकारने लोकांकडून मते मागवली होती.

ही मते प्राप्त झाली असून त्याचा अभ्यास सुरु असल्याचे देसाई म्हणाले होते. या धोरणासंदर्भात जनतेकडून मागवलेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास करुन लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही देसाई यांनी सांगितलं होतं. मागच्या सरकारच्यावेळी मंत्री असताना आम्ही संपूर्ण माहिती भाजप पक्षापर्यंत पोहोचवू शकलो नव्हतो. मात्र, यावेळी या संदर्भातील संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय हा निर्णय घेणार नाही. शेतकर्‍यांच्या हिताचं हे नवं सरकार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना प्रत्येक गोष्टीचा कसा फायदा होईल, याकडे आमचं लक्ष असल्याचे देसाई म्हणाले होते.

Back to top button