लोणी : 8 दिवसांत 100 टक्के पंचनामे पूर्ण करा : ना. विखे

लोणी : 8 दिवसांत 100 टक्के पंचनामे पूर्ण करा : ना. विखे

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  महसूल, कृषी व ग्रामविकास विभागांनी समन्वयाने कामकाज करावे. अतिवृष्टीने बाधित क्षेत्राचे 30 सप्टेंबरपर्यंत 100 टक्के पंचनामे पूर्ण करावे, असे निर्देश देत अवैध वाळू उपसा, खडी क्रशर 100 टक्के बंद करा, अशा सक्त सूचना महसूल, पशुसंवर्धन व दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केल्या.  राहाता, संगमनेर, श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत आढावा बैठक महसूलमंत्री ना. विखे पा. यांच्या अध्यक्षतेखाली प्रवरानगर येथे पार पडली. यावेळी ते महसूल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व मंडलाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी अनिल पवार, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोले, तहसीलदार कुंदन हिरे, अमोल निकम, प्रशांत पाटील, फसियोद्दीन शेख, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, अनिल नागणे, श्रीरामपूर भाजपा तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे आदी उपस्थित होते.
प्रारंभी तलाठी, ग्रामसेवक व महसूल अधिकारी- कर्मचार्‍यांना पंचनामे करताना उद्भवणार्‍या अडचणी महसूलमंत्री विखे पा. यांनी जाणून घेतल्या.

ना. विखे पा. म्हणाले, तूर्तास ई-पीक पाहणीच्या कामापेक्षा पीक पंचनाम्यांना प्राधान्य द्या. शेतकर्‍यांना संकटातून दिलासा देण्यासाठी अधिकारी – कर्मचार्‍यांनी सकारात्मक राहून कामकाज केले पाहिजे. फळबागांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम कृषी विभागाने करावे, असा सूचना त्यांनी केल्या.  यावेळी राहाता, संगमनेर, श्रीरामपूर व राहुरीच्या तहसीलदारांनी पीक पंचनाम्यांच्या प्रगतीविषयी माहिती सांगितली. राहाता तालुक्यात साडेआठ हजार हेक्टर क्षेत्राचे 11,376 पंचनामे झाले, असे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील तलाठ्यांनी दाखल केलेल्या एका गुन्ह्याच्या कारणाने गावात काम करू दिले जात नसल्याच्या माहितीची ना. विखे पा. यांनी दखल घेत, या त्रासाची माहिती घाबरून दडवू नका. वरीष्ठांनीसुद्धा अशा प्रकारांना पाठिशी घालू नये, असे त्यांनी सूचित केले.

राजकीय दबावाला बळी पडू नका..!
अनधिकृत वाळू उपसा, खडी क्रशरबाबत कठोर भूमिका घेत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता दोषींवर गुन्हे दाखल करा, असे निर्देश ना. विखे पा. यांनी महसूल यंत्रणेला दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news