सोनई : पुढारी वृत्तसेवा : मुळा साखर कारखान्याच्या नवीन इथेनॉल प्रकल्पातून सन 2021-22 च्या हंगामात सव्वा कोटी लिटरची इथेनॉल निर्मिती झाली. आता ऑक्टोबरमध्ये सुरू होणार्या हंगामात 4 कोटी लिटरचे इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती आमदार शंकरराव गडाख यांनी दिली. मुळा कारखान्याची वार्षिक सभा काल झाली. यावेळी आमदार गडाख बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला माजी खासदार व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख उपस्थित होते. तसेच कारखान्याचे उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार गडाख म्हणाले की, इथेनॉलचे दर शासनाने निश्चित केलेले आहेत. इथेनॉल उत्पादनाला शासनाचे प्रोत्साहन असून आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने इथेनॉल निर्मितीला देशात महत्त्व दिलं जात आहे. मुळा कारखान्याने इथेनॉल प्रकल्प उभारून 1 लाख लिटर प्रतिदिन इथेनॉल निर्मितीची क्षमता निर्माण केली आहे. त्यासाठी 90 कोटी रुपये खर्च केले आहेत. मागील वर्षी प्रकल्प उशिरा सुरू झाल्याने सव्वा कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली. पण आता ऑक्टोबरपासून सुरू होणार्या गाळप हंगामात 4 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती केली जाईल. प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्ज परतफेडीसाठी त्याची मदत होईल.
किमान 125 लाख टन साखर निर्यातीला केंद्राने परवानगी द्यावी. कारखान्यांचे शिल्लक साठे कमी करून आर्थिक तरलता येण्यासाठी, तसेच स्थानिक बाजारात साखरेचे दर वाढण्याच्या दृष्टीने किमान 125 लाख टन साखर निर्यात करण्यास केंद्र सरकारने कारखान्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार गडाख यांनी केली. अहवाल सालात 164 कोटींची कर्जफेड केली. गळीताचा रेट वाढवला. 15 लाख 31 हजार टनाचे विक्रमी गाळप केले. 97 कोटींचे इथेनॉल उत्पादन केले. 42 कोटींची वीजनिर्मिती केली. सभासदांची परतीची शेवटची ठेव 5 कोटीची राहिली होती, ती व्याजासह दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय आमदार गडाख यांनी जाहीर केला.
एप्रिल व मे महिन्यांत गळीत झालेल्या ऊसाला सव्वा तीन कोटी, तर ऊसतोडणी मजुरांना एक कोटीचे अनुदान दिल्याचे त्यांनी सांगितले. उसाचा दर 2435 रुपयांप्रमाणे जाहीर करून पूर्वी दिलेली रक्कम वजा जाता फरक रकमेचे पेमेंट दिवाळीपूर्वी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शेतकर्यांच्या आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन आमदार गडाख यांनी सभेत काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. कारखान्याच्या दैनंदिन गाळपाचा रेट किमान 9 हजार टन राहील. ऊसनोंदीच्या याद्या गट ऑफिसला प्रसिद्ध केल्या जातील. त्या बाबत काही तक्रार असेल तर तक्रार पेटीत ती द्यावी. त्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येईल. तक्रारीचे वेळीच निवारण करण्यात येईल, असे आमदार गडाख यांनी सांगितले.
हार्वेस्टरने ऊस तोडण्याची मानसिकता सभासदांमध्ये तयार झाली पाहिजे. ज्यांचा दोन किंवा तीन एकरच्या पुढे ऊस आहे, अशा सभासदांना हार्वेस्टरने ऊसतोड देण्याच्या बाबतीत धोरण घेतले जाईल. रोज 11 हजार टन ऊस तोड करण्याची यंत्रणा भरण्यात येईल. याप्रमाणे निर्णय जाहीर करुन त्याची जबाबदारी संबंधित अधिकार्यांवर सोपविली जाईल. प्रारंभी कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त व अहवालाची माहिती दिली. सभेत सर्वश्री सीताराम झिने, जालिंदर येळवंडे, शरद जाधव, दादासाहेब चिमणे, बाळासाहेब सोनवणे, रामकिसन शिंदे, राजेंद्र टेमक, अप्पासाहेब निमसे, जनार्धन कुसळकर यांनी चर्चेत भाग घेतला. डेव्हलपमेंट मॅनेजर व्ही.के.भोर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सभासद मोहन सोनवणे (मोरगव्हाण), रामदास काळे (इमामपूर), विजयाबाई आहेर (म्हा.पिंपळगाव), अनिता जोशी (अंमळनेर) यांनी सर्वाधिक ऊसउत्पादनाबद्दल त्यांचा आमदार गडाख यांनी सन्मान केला.
दहा हजार टन विस्तार वाढीला मंजुरी
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दरवर्षी 14 ते 15 लाख टन उसाचे उत्पादन होते. उशिरापर्यंत कारखाना चालवावा लागतो. उन्हाळ्यात मजुरांची ऊस तोडण्याची क्षमता कमी होते. जायकवाडी धरण भरलं नाही, तर मुळा धरणाचे पाणी मराठवाड्याला जाते, म्हणून जादा क्षमतेने गऴीत करून हंगाम 15 किंवा 30 एप्रिलअखेर चालविल्यास ते सभासदांच्या दृष्टीनेही लाभदायक ठरेल, म्हणून कारखान्याची गाळप क्षमता 7 हजार टनावरून 10 हजार टनापर्यंत करण्यास सभासदांनी मंजुरी दिल्याबद्दल आमदार गडाख यांनी आभार मानले.
कारखान्याला गडाखांचे नाव द्या : टेमक
मुळा साखर कारखान्याचे लोकनेते यशवंतरावजी पाटील गडाख मुळा सहकारी साखर कारखाना असे नामांतर करावे अशी मागणी करजगावचे युवा नेते राजेंद्र टेमक यांनी मागणी करताच त्यास सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.