शेवगाव : पैसे मागणार्‍या लिपिकाची धुलाई | पुढारी

शेवगाव : पैसे मागणार्‍या लिपिकाची धुलाई

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : कर्‍हेटाकळी-खानापूर रस्त्याच्या कामासाठी खडीची वाहतूक करणार्‍यांवर कारवाई टाळण्यासाठी अनधिकृतपणे पैशाची मागणी करणार्‍या शेवगाव तहसील कार्यालयातील एका लिपिकाची डंपर चालक व त्याच्या साथीदाराने चांगलीच धुलाई केली. याबाबत वरिष्ठांचे कुठलेही आदेश नसताना कारवाईसाठी गेलेल्या लिपिकाचे धाडस त्याचाच अंगलट आल्याची खमंग चर्चा तालुक्यात होत आहे. मात्र, हा प्रकार लपविण्यासाठी त्यांन पोलिसात कुठलीच तक्रार केली नाही.

पैठण रस्त्यावरील कर्‍हेटाकळी शिवारात सुरू असलेल्या एका रस्त्याच्या कामावर बुधवारी (दि.21) सायंकाळी शेवगाव तहसील कार्यालयातील एक लिपिक स्वत:च्या वाहनातून वरिष्ठांचे आदेश नसताना गेला. तेथे त्याने खडी वाहतूक करणारा डंपर चालक व संबंधित व्यक्तींकडे कारवाई टाळण्यासाठी काही रकमेची मागणी केली. संबंधितांनी त्यास होकार देऊन त्याचे मोबाईलमध्ये शूटिंग केले. त्यानंतर त्यास तेथेच चालक व संबंधितांनी चांगलाच चोप दिला. सायंकाळच्या सुमारास घडलेल्या हा प्रकार पाहण्यासाठी गर्दी होताच, त्यास तेथून उचलून एका फार्म हाऊसवर नेवून पुन्हा त्याची धुलाई केली. त्याने कसबसे तेथून सुटका करून शेवगावला पळ काढला.

मात्र याबाबत ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ करून दोघांनीही तक्रार दाखल करण्याचे टाळले असले तरी, या प्रकाराची खबर काही वेळातच शेवगावमध्ये पसरल्याने चर्चेला उधाण आले. या प्रकाराबाबत तहसील कार्यालयातही दबक्या आवाजात चर्चा चालू होती. मात्र, तहसीलदार यांनी ‘मला याबाबत माहिती नाही, चौकशी करतो’, असे उत्तर देऊन विषय टाळण्याचा प्रयत्न केला. एका आठवड्यात एका प्राध्यपकानंतर तहसील लिपिकाच्या धुलाईचा हा दुसरा प्रकार घडला आहे. याअगोदर तहसील कार्यालयातील दोन लिपिकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागण्याच्या कारणावरूण गुन्हे दाखल केले आहेत. तालुक्यात काही कर्मचारी आदेश नसताना पैशाच्या लालसेने ‘हम करेसो कायदा’ वापरत असल्याने असे प्रकार घडत असून, त्यामुळे इतरांचीही लक्तरे वेशीला टांगली जात आहेत.

Back to top button