‘त्या’ शिक्षकावर कारवाई कधी? बदली की बक्षिसी | पुढारी

‘त्या’ शिक्षकावर कारवाई कधी? बदली की बक्षिसी

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : मडकी येथील ‘त्या’ कामचुकार शिक्षकाची ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर बदली झाली खरी. मात्र, त्याच्यावर अद्याप कारवाई झाली नाही. शिक्षण विभागाने या शिक्षकाला चांगलीच तंबी देऊन एखाद्या शाळेत बदली करणे आवश्यक असताना, बक्षिसी दिल्यासारखे शिक्षण विभागात घेण्यात आलेले आहे. त्यामुळे मडकी ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे.
गेल्या वर्षापासून मडकी येथील त्या कामचुकार प्राथमिक शिक्षकाची बदली व कारवाईच्या मागणीसाठी पालक व ग्रामस्थांनी येथील शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला. मडकी ग्रामस्थांनी अनेकवेळा नेवाशाच्या शिक्षण विभागाला लेखी तक्रारीचे निवेदने दिली.

परंतु, येथील शिक्षण विभागाने सतत मडकी ग्रामस्थांना थातूरमातूर कागदीघोडे नाचवून शिक्षकावर कारवाईकडे दुर्लक्ष केलेले आहे.
गटशिक्षणाधिकारीच या शिक्षकाला सतत अभय देत असल्याचा आरोप मडकी ग्रामस्थांनी निवेदनात अनेकवेळा केलेला आहे.
अखेर या ग्रामस्थांनी 19 सप्टेंबरला पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आल्याने संबंधित शिक्षकाची चौकशी सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर अहवाल आल्यानंतर कारवाई करू. ग्रामस्थांनी उपोषण स्थगित करावे, असे लेखी आश्वासन गट शिक्षणाधिकार्‍यांनी दिले होते.

परंतु, गेल्या वर्षापासून नेवाशाच्या शिक्षण विभागाचा अनुभव पाहता मडकी ग्रामस्थ उपोषणावर ठाम राहिले. अखेर पंचायत समितीसमोर उपोषण सुरू झाले. त्यानंतर बीडीओंच्या मध्यस्थीने लेखी आश्वासन घेऊन उपोषण मागे घेण्यात आले. हा विषय तात्पुरता सुटला असला तरी, त्या शिक्षकावर कारवाई झालीच नसल्याने मडकीकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. या शिक्षकाची तालुक्यात इतरत्र बदली होऊन कारवाई होणे गरजेचे असल्याचे नागरिक सांगतात. तालुक्यात अनेक ठिकाणी शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.

शिक्षण विभागाने या शिक्षकाला चांगलीच तंबी देऊन एखाद्या शाळेत बदली करणे आवश्यक होते. मात्र, बक्षिसी दिल्यासारखे त्याला शिक्षण विभागात घेण्यात आलेले आहे. त्यामुळेच या शिक्षकाला कोण पाठीशी घालते, त्याला कोणाचा वरदहस्त आहे, याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आता पुन्हा नव्याने आंदोलन करावे काय? असा सवाल मडकी ग्रामस्थांनी केला आहे.

Back to top button