संगमनेर : वाळूतस्करास सहा महिने कारावास | पुढारी

संगमनेर : वाळूतस्करास सहा महिने कारावास

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकातील महसूल तलाठ्यांना दमबाजी व धक्काबुक्की करीत ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर पळवून नेणारा वाळू तस्कर तन्वीर कदीर शेख याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी सहा महिन्याचा सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, पाच वर्षांपूर्वी कोल्हेवाडी-संगमनेर रस्त्याने बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणार्‍या तन्वीर कदीर शेख या वाळू तस्कराचा ट्रॅक्टर कामगार तलाठी साईनाथ ढवळे, बाळकृष्ण सावळे, भीमराज काकड आणि सुमीत जाधव या चौघांनी पकडला होता.

ही माहिती शेख यास समजताच तो घटनास्थळी आला आणि महसूलच्या पथकाला दमबाजी करत वाळूचा ट्रॅक्टरच पळवून नेला. मात्र पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास पकडले. त्यावेळी शेख याने पथकास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर पुन्हा पळवून नेला होता.  या घटनेनंतर तहसीलदारांच्या आदेशावरुन तलाठी साईनाथ ढवळे यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तन्वीर शेख याच्यावर सरकारी कामामध्ये अडथळा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण परदेशी यांनी तन्वीर शेख याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे संपूर्ण कामकाज तात्कालीन अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. वाय. भोसले यांच्यासमोर झाले होते. या खटल्यात सरकारी वकील बी.जी. कोल्हे यांनी सहा साक्षीदार तपासले होते. त्यात फिर्यादीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्याच्या नंतर न्यायाधीश मनाठकर यांनी शिक्षा सुनावली.

Back to top button