पारनेर: जवळा परिसरात बिबट्यांचा कायमचा मुक्काम | पुढारी

पारनेर: जवळा परिसरात बिबट्यांचा कायमचा मुक्काम

जवळा, पुढारी वृत्तसेवा: पारनेर तालुक्यातील जवळा परिसरात बिबट्यांनी कायमचा मुक्काम ठोकला असून, नुकतीच बिबट्यांच्या हल्ल्यात घोडी ठार झाली आहे. बिबटे आता पिंजर्‍यानाही दाद देत नसून अंदाज घेऊन ते पिंजर्‍यांच्या शेजारुन निघून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. बिबट्यांची शोध मोहिम वन विभागाने राबवून त्यांना पकडण्यासाठी वेगळी ठोस उपाय योजना करण्याची नागरिकांची मागणी आहे. जवळ्याच्या गायरान भागात मेंढपाळाच्या पालावर रात्रीच्या वेळी बिबट्यांनी हल्ला करत घोडी ठार केली. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जवळा परिसराचा अर्धाअधिक पूर्व भाग हा डोंगर-दर्‍यांनी वेढलेला आहे. कुकडीचा कालवा पायथ्यापासून वाहत असल्याने ऊस, फळबागा, इतर पिके यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी हा परिसर सुरक्षित वाटत असावा. त्यामुळेच या परिसरात बिबट्यांनी आपले कायमचे बस्तान बसवले आहे.परंतु सध्या सततच्या पावससामुळे बिबट्यांनी ऊस पट्ट्यातून डोंगर भागाकडे मुक्काम हलवला आहे.
जवळा गावाच्या चोहोबाजूंनी गव्हाळी शिवार, अलभर वस्ती, पठारे मळा, सालके वस्ती, कोठावळे मळा, बारांगनी, गायरानातील डोंगर आदी भागात बिबट्यांचे दर्शन आता नित्याचीच बाब बनली आहे. दररोज बिबट्यांनी कुठे ना कुठे वन्यप्राणी, पाळीव प्राण्यांची शिकार किंवा हल्ले झाल्याचे कानी पडते. नागरिकांच्या डोळ्यासमोरून बिबट्यांनी अचानक हल्ला करत पाळीव प्राण्यांची शिकार केल्याच्या घटना ही अनेक वेळा घडल्या आहेत.

त्यामुळे बिबट्यांची दहशत या परिसरात वाढत चालली असून त्यांच्या कायमच्या वास्तव्याने जवळा परिसरात माणसे दिवसा-ढवळ्या शेतात जाण्यास घाबरत आहेत. काही ठिकाणी तर चक्क बिबट्यांनी आपला संसार थाटला असल्याचे व पिलांसह मस्ती करत उसात जाऊन दिसेनासे होत असल्याचे पहायला मिळते. वनविभागाने शोधमोहीम राबवून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जवळा परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

Back to top button