नदीच्या पुलावरुन जीवघेणा प्रवास ; चांदेकसारे- घारीकरांची गैरसोय दूर होईल का? | पुढारी

नदीच्या पुलावरुन जीवघेणा प्रवास ; चांदेकसारे- घारीकरांची गैरसोय दूर होईल का?

चांदेकसारे : पुढारी वृत्तसेवा : चांदेकसारे- घारी या दोन्ही गावांना जोडलेल्या नदीवरील पुलावर पाणी आल्याने या दोन्ही गावांच्या ग्रामस्थांसह विद्यार्थी व प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरुन रस्ता पार करावा लागत आहे. दरम्यान, नदीवरील पुलाची उंची वाढवा, अशी मागणी घारी गावचे सरपंच रामदास जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.  निवेदनात जाधव यांनी म्हटले की, चांदेकसारे- घारी या दोन्ही गावांना जोडणारा पुल पुरातन काळातील आहे.

या पुलाची उंची कमी असल्याने पोहेगाव परीसरात पाऊस पडताच पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प होते. डाऊच बुद्रुक व घारी येथील ग्रामस्थांचा संपर्क चांदेकसारेसह कोपरगावच्या पुलावरुन होतो. डाऊच बुद्रुक व घारी येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह दूध पोहचविण्यासाठी ग्रामस्थांना या पुलावरुन जावे लागते, मात्र पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहतूक ठप्प होते. या पार्श्वभूमीवर या पुलाची उंची त्वरीत वाढवावी, अशी मागणी जाधव, किरण पवार, शिवाजी जाधव, अविनाश पवार, रामकिसन काटकर, संदीप पवार, लक्ष्मण पवार, माऊली पवार, यमाजी पवार, रंगनाथ पवार, शिवाजी बर्डे यांनी केली आहे.

Back to top button