नगर : लष्करी जवानाची ऑनलाईन साडेआठ लाखांची फसवणूक | पुढारी

नगर : लष्करी जवानाची ऑनलाईन साडेआठ लाखांची फसवणूक

नगर : पुढारी वृत्तसेवा : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगत, लष्करी जवानाची 8 लाख 46 हजार 358 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भोपेंदर सरीभरेलाम सिंग (वय 42, रा. जिंद्राणकला, पो. कलानो, ता. जि. रोहतक, हरियाणा. सध्या रा.एसी डेपो, आर्म्ड कोअर, भिंगार, कॅन्टोन्मेंट, नगर) यांनी सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मोबाईल क्रमांकधारक अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भोपेंदर सिंग हे येथील आर्म्ड कोअर सेंटरमध्ये कार्यरत आहेत. त्यांची 30 एप्रिल ते 30 ऑगस्ट या कालावधीत फसवणूक करण्यात आली आहे. अज्ञात आरोपींनी वेगवेगळ्या सात मोबाईल क्रमांकावरून सिंग यांच्याशी संपर्क साधून त्यांची ऑनलाईन 8 लाख 46 हजार 358 रुपयांची फसवणूक केली आहे. सिंग यांच्या मोबाईलवर 30 एप्रिल 2022 रोजी एका मोबाईलवरुन फोन आला.

आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून बोलत आहोत, तुमचे आयकर विभागाचे 12 लाख रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत, ते तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्हाला जीएसटी भरावा लागेल, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी सिंग यांनी तोतया अधिकार्‍याला ऑनलाईन साडेआठ लाख रूपये ट्रान्सफर केले.  त्यानंतर सिंग यांनी फोन कॉल आलेल्या नंबरवर संपर्क केला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Back to top button