नगर : शहर बँकेत आणखी 32 तोळे बनावट दागिने, फसवणुकीचा आकडा पोहचला 3.36 कोटींवर

नगर : शहर बँकेत आणखी 32 तोळे बनावट दागिने, फसवणुकीचा आकडा पोहचला 3.36 कोटींवर

नगर : पुढारी वृत्तसेवा  : शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारण प्रकरणाच्या तपासात मंगळवारी (दि.20) आणखी एका खात्यात 32 तोळे बनावट दागिने आढळून आले आहेत. या दागिन्यांवर 10 लाख 70 हजारांचे कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे शहर बँकेच्या फसवणुकीचा आकडा आता सुमारे 3 कोटी 36 लाखांवर पोहोचला आहे.  सोनेतारण घोटाळा उघडकीस आल्यापासून शहर बँकेतील सोनेतारण कर्ज प्रकरणांची तपासणी सुरू आहे.

शहरातील इतरही काही नामांकित पतसंस्थांना कर्ज खाती तपासण्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी शहर बँकेच्या दोन कर्ज खात्याच्या तपासणीमध्ये सुमारे 270 ग्रॅम म्हणजे 27 तोळे बनावट सोने आढळले होते. तर, मंगळवारी पुन्हा 32 तोळे बनावट दागिने आढळून आले आहेत. बनावट सोनेतारण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 39 आरोपी केले असून, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

'नागेबाबा'सह इतर पतसंस्थांची तपासणी
शहर बँकेच्या पॅनलवरील गोल्ड व्हॅल्युअर अजय कपाळे यांच्या घर झडतीत पोलिसांना शहर बँकेतील तीन शाखांच्या कर्ज पावत्या, तसेच संत नागेबाबा, महात्मा फुले, डॉन बॉस्को, जैन मर्चंट या पतसंस्थांच्या कर्ज पावत्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे पतसंस्थांमधील कर्ज खाती तपासण्यासाठी पोलिसांकडून पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, या पतसंस्थांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने चर्चांना उधाण आले.

मंगळवारी तपासणीत शहर बँकेच्या एका खात्यात 32 तोळे बनावट दागिने आढळून आले. इतर पतसंस्थांना तपासणीच्या सूचना दिल्या आहेत. अद्याप कोणताही प्रतिसाद नाही.
                                                   – गजेंद्र इंगळे, पोलिस उपनिरीक्षक, कोतवाली

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news