नगर : सप्टेंबरमध्ये धो-धो ! 9130 हेक्टर नुकसान | पुढारी

नगर : सप्टेंबरमध्ये धो-धो ! 9130 हेक्टर नुकसान

नगर : पुढारी वृत्तसेवा : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 9 हजार 130 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले. यामध्ये राहाता व पारनेर तालुक्यांतील शेतपिकांचा सर्वाधिक समावेश आहे. या अतिवृष्टीत पारनेर तालुक्यात वीज कोसळून एक जण दगावला आहे. या अतिवृष्टीत 30 जनावरे दगावली असून, 151 घरांची अंशत: पडझड झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्राथमिक नुकसानीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे.

यंदा सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. 1 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा फटका अकोले, कोपरगाव, नेवासा, पारनेर, संगमनेर, श्रीरामपूर व राहाता या सात तालुक्यांतील शेतपिकांना बसला आहे.या तालुक्यांतील 9 हजार 129.8 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. जामखेड तालुक्यातील 2, कर्जत तालुक्यातील 5, कोपरगाव तालुक्यातील 6, पारनेर तालुक्यातील 4, संगमनेर तालुक्यातील 96, शेवगाव तालुक्यातील 7, श्रीगोंदा तालुक्यातील 4 व राहाता तालुक्यातील 27 अशा एकूण 151 घरांची अंशत: पडझड झाली आहे. राहाता तालुक्यातील 371 कुटुंबाच्या घरांना दोन दिवस पुराच्या पाण्याचा विळखा होता.

त्यामुळे या घरांचे देखील नुकसान झाले आहे.याशिवाय या तालुक्यातील 275 झोपड्यांचे देखील नुकसान झाले आहे.
या अतिवृष्टीत 30 जनावरे दगावली आहेत. यामध्ये 10 मोठ्या जनावरांचा समावेश आहे. कर्जत तालुक्यातील 2, कोपरगाव 2,नेवासा, पारनेर,पाथर्डी, राहुरी, राहाता व संगमनेर या तालुक्यांतील प्रत्येकी एका जनावरांचा समावेश आहे.  दगावलेल्या 20 लहान जनावरांत पारनेर तालुक्यातील 12, संगमनेर तालुक्यातील 5, श्रीगोंदा 2 व कोपरगाव तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

तालुकानिहाय शेतपिकांचे नुकसान (हेक्टर)
अकोले – 2 हजार 490, कोपरगाव – 412, नेवासा – 369, पारनेर – 2 हजार 685, संगमनेर – 58.8, श्रीरामपूर 400, राहाता : 2 हजार 715.

65.59 हेक्टर क्षेत्र खरडून गेले
1 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत अकोले तालुक्यातील समशेरपूर व राजूर महसूल मंडळांतील 63.39 हेक्टर क्षेत्र खरडून गेले आहे. 11 सप्टेंबर रोजी पारनेर तालुक्यातील 2.20 हेक्टर क्षेत्र देखील पावसाने खरडून गेले. 19 दिवसांत एकूण 65. 59 हेक्टर शेतीचे क्षेत्र खरडून गेल्याचा अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.

Back to top button