नगर: ‘शिक्षक बँके’ची आता सुनावणी सोमवारी | पुढारी

नगर: ‘शिक्षक बँके’ची आता सुनावणी सोमवारी

नगर, पुढारी वृत्तसेवा: शिक्षक बँक निवडणुकीकडे 10 हजार सभासद गुरुजींचे लक्ष लागले आहे. मात्र, कालच्या सुनावणीतही सरकारने न्यायालयासमोर आपले म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे आता न्यायालयाने 26 सप्टेंबरला पुढील सुनावणी ठेवल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. शिवाजीराव शेळके यांनी दिली.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यात 24 जुलै रोजी मतदान, तर 25 ला मतमोजणी होती. मात्र, 15 जुलैच्या आदेशान्वये ही निवडणूक अतिवृष्टीचे कारण देऊन 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. यानंतर गुरुमाऊली गटातील काही उमेदवारांनी या संदर्भात खंडपीठात धाव घेऊन निवडणूक घेण्याची विनंती केली. त्यावर सुनावणी सुरू आहे. 30 ऑगस्टच्या सुनावणीत न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढताना 12 सप्टेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिली होती. मात्र, या तारखेलाही संबंधित म्हणणे न आल्याने न्यायालयाने 19 सप्टेंबरची तारीख दिली. या दिवशी निवडणुकीची तारीख अंतिम केली जाईल, अशी उमेदवारांना अपेक्षा होती. मात्र, कालच्या सुनावणीतही सरकार पक्षाने बाजू मांडली नाही. यावेळीही निर्णय होऊ शकला नाही. सरकारला म्हणणे सादर करण्यासाठी सात दिवसांची पुन्हा मुदत देण्यात आली.

अकोलेत सर्वाधिक पाऊस असताना त्या ठिकाणी ग्रामपंचायती निवडणुका घेतल्या जातात. अगस्ती कारखान्याबाबतही निर्णय होतो. मात्र, शिक्षक बँकेसंदर्भातच सरकार आपले म्हणणे का मांडत नाही, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत सरकारने सकारात्मक धोरण ठेवणे गरजेचे आहे.
-शरद वांढेकर, जिल्हा कार्याध्यक्ष, संघ

Back to top button