जामखेड : जय श्रीराम शुगरने दिला 2353 रुपयांचा दर, उर्वरित हप्ता 15 दिवसात देणार : निंबे | पुढारी

जामखेड : जय श्रीराम शुगरने दिला 2353 रुपयांचा दर, उर्वरित हप्ता 15 दिवसात देणार : निंबे

जामखेड, पुढारी वृतसेवा: मागील गळीत हंगाममध्ये तीन लाख 27 हजार मेट्रिक टन ऊस गाळप केला, तर तीन लाख 12 हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे. कारखाना सुरू झाल्यापासून यावर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने चालला, हा कारखाना एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू असल्याने ऊस गाळप मोठ्याप्रमाणात झाले. यामुळे शेतकर्‍यांना फायदा झाला. जय श्रीराम शुगर साखर कारखान्याने शेतकर्‍यांना 2353 रुपयांचा दर दिला आहे. यातील 2300 रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले असून, उर्वरित 53 रुपयांचा हप्ता 15 दिवसात देणार असल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष के. एन. निंबे यांनी सांगितले.

कारखाना प्रतिदिन दोन हजार मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता होता, त्या कारखान्याची क्षमता नुकतीच वाढवली आहे. ती आता तीन हजार मेट्रिक टन झाली आहे. यासाठी अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले आग्रही होते. मागील गळीत हंगामातील उतारा 11.04 टक्के होती, तर चालू हंगामाचे बॉयलर प्रदिपन शुक्रवारी (दि.30) होणार आहे.

विस्तारीकरणासाठी सर्व पुरवठादार, काम करणारे अभियंते, कुशल कामगार, कारखान्याचे अधिकारी व कामगारांनी सहकार्य केल्याने कामे वेळेत पूर्ण केली आहेत. त्यामुळे चालू गळीत हंगामसाठी तोडणी वाहतूक यंत्रणेची क्षमताही वाढवली असून, ट्रॉली ट्रॅक्टर 101 व सिंगल ट्रॉली-ट्रॅक्टर 55, असे एकूण 156 वाहतूक यंत्रणांचा करार पूर्ण झाल्याचे मुख्य शेती अधिकारी एम. एम. मोहिते यांनी सांगितले. कारखाना विनाखंडीत योग्य प्रकारे चालेल, अशी ग्वाही कारखान्याचे महाव्यावस्थापक व्ही. वी. निंबाळकर व एस. ए. साखरे, एन. डी. चौधरी यांनी दिली. विस्तारीकरणामध्ये कारखन्याचे मुख्य लेखापाल सोमनाथ शिंदे, खरेदी अधिकारी प्रदीप दंडे, सर्व उपखेतील प्रमुख, सर्व अभियंते व केमिस्ट, शेती विभगाचे कर्मचार्‍यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचेही निंबे यांनी सांगितले.

Back to top button