जवळा, पुढारी वृत्तसेवा: सतत होणार्या पावसाने पारनेर तालुक्यातील जवळा परिसरात पाणी साचून त्यावर डेंग्यूच्या डासांची मोठ्या प्रमाणात पैदास झाली आहे. त्यामुळे डेंग्यूबाधितांची संख्या प्रचंड वाढली असून जवळा परिसर बेजार झाला आहे. विशेषत : जवळ्यातील पाटील मळा परिसरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे तेथील रहिवासी गोरख सालके यांनी सांगितले. जवळा परिसरात डेंग्यूचे सुमारे साठ ते सत्तर रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. आरोग्य विभागाने तातडीने सर्वेक्षण करून प्राथमिक उपचार करण्याची गरज असल्याचे ग्रामपंचायतीने फवारणी करण्याला प्राधान्य दिले, तरच डेंग्यूच्या प्रसारावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल.
ग्रामस्थांनी अनेक वेळेस मागणी केल्यानंतर जवळा ग्रामपंचायतीने आताशी औषध फवारणी सुरू केली आहे. परंतु तोपर्यंत डेंग्यूने डोके चांगलेच वर काढले आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता आता डेंग्यू लवकर आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायतीने तातडीने उपाय योजना करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.