नान्नजला बॉम्बची अफवा पसरविणारा मुंबईत जेरबंद | पुढारी

नान्नजला बॉम्बची अफवा पसरविणारा मुंबईत जेरबंद

नान्नज; पुढारी वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील नान्नज येथील मध्यवस्तीत असणार्‍या बालाजी मेडिकलमध्ये सहा बॉम्ब ठेवल्याची खबर दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिनेश सुतार यास अटक केली आहे. त्याचा ताबा घेण्यासाठी जामखेडचे पोलिस पथक मुंबईला रवाना होणार आहे. मुंबई कंट्रोल रुमला मिळालेल्या या माहितीनंतर पोलिस खात्यात एकच खळबळ उडाली होती. नान्नज येथील बालाजी मेडिकलसह संपूर्ण परिसराची जामखेड पोलिसांसह बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली. मात्र, संपूर्ण तपासाअंती ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी मुंबईतील एल. टी. मार्ग पोलिसांनी दिनेश सुतार याला मुंबईत रविवारी अटक केली. त्याला सोमवारी (दि. 19) मुंबई येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दिनेश सुतार याच्याविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याने त्याचा ताबा घेण्यासाठी जामखेड पोलिसांचे पथक मुंबईस जाणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती यांनी दिली.

Back to top button