नद्या दुथडी, सरासरी पार.. जोर धारा..! नगर जिल्ह्यात आणखी तीन दिवस पावसाचेच | पुढारी

नद्या दुथडी, सरासरी पार.. जोर धारा..! नगर जिल्ह्यात आणखी तीन दिवस पावसाचेच

नगर; पुढारी वृत्तसेवा: गणेश प्रतिष्ठापनेपासून सुरू झालेला पाऊस पित्र पंधरवड्याची नवमी ओलांडली, तरी थांबायचे नाव घेईना. यंदाच्या पावसाने 70.5 मि.मी.ने सरासरी ओलांडत 518.6 मि.मी.ची बरसात केली. जोरधारांनी जिल्ह्यातील धरणे, तलाव ओव्हरफ्लो झाले. सर्व नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. जामखेड व पाथर्डी हे दोन तालुके वगळता उर्वरित 12 तालुक्यांनी सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमान सरासरी 448.1 मि.मी. आहे. जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिली होती.

त्यानंतर मात्र पावसाने जोर धरला आहे. ऑगस्ट महिन्यात भंडारदरा, निळवंडेसह लहान-मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली. मुळा धरणही ओव्हरफ्लो झाल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. जिल्ह्यातून वाहणार्‍या गोदावरी, प्रवरा, मुळा, भीमा, सीना या नद्यांना पूर आला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस सुरू आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांतून नदीपात्रांत विसर्ग सुरु असल्यामुळे गोदावरी, प्रवरा, मुळा, सीना, भीमा, कुकडी, घोड या नद्या सध्या दुथडी वाहू लागल्या आहेत.

पावणेचार महिन्यात जिल्ह्यात सरासरी 518 मि.मी. पाऊस झाला आहे. परतीचा पाऊस सुरु झाला आहे. नगर जिल्हा हा परतीच्या पावसाचा आहे. त्यामुळे या पावसाने सरासरी अधिकच वाढणार आहे. वरूणराजाच्या आशीर्वादाने जिल्ह्यात खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगाम देखील जोमात असणार आहे.

या पावसामुळे काही गावांत ओढे, नाले वाहू लागले. तलावांत देखील पाणी साचले. मात्र, जामखेड व इतर तालुक्यांतील काही गावांत अद्याप ओढे, नाले वाहिले नाहीत. नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, शेवगाव, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर व राहाता या बारा तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

आतापर्यंतचा तालुकानिहाय पाऊस (मि.मी.)
नगर 487.6, पारनेर 490, श्रीगोंदा 517.7, कर्जत 485.1, जामखेड 429.1, शेवगाव 488.7, पाथर्डी 446, नेवासा 458.5, राहुरी 494.9, संगमनेर 497.8, अकोले 857.8, कोपरगाव 557.5, श्रीरामपूर 470, राहाता 521.7.

 

Back to top button