बोटा : आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी उपाशीच! | पुढारी

बोटा : आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी उपाशीच!

बोटा : पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील पठार भागात ब्राम्हणवाडा येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात 55 विद्यार्थ्यांना दिवसभर उपाशी राहिल्याची वेळ आल्याचा निंदनीय प्रकार समोर आला आहे. आदिवासी अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज आहे. ब्राम्हणवाडा येथे शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह आहे. पाचवी ते आठवी पर्यंतचे 55 विद्यार्थी या वसतिगृहात वास्तव्यास आहेत. या विद्यार्थ्यांना नाश्ता, जेवण सुविधा आदिवासी विकास विभागाच्या मार्फत दिले जाते. त्यासाठी वसतिगृहास गृहउद्योग यांना टेंडर दिले आहे. त्यात त्यांनी एक सब कॉन्ट्रॅक्टर नेमला. त्या मार्फत सुविधा पुरवल्या जातात, परंतु या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण मिळाले नाही. दुपारी 2 वाजता वसतिगृह अधीक्षक विजय भारती यांनी विद्यार्थ्यांची दया आली आणि त्यांना वडापाव आणून खाऊ घातले. संध्याकाळी जेवणाचे साहित्य आणून स्वयंपाक करून जेवण दिले.

सबंधित टेंडर घेतलेल्या गृह उद्योगचे अशोक बंडगर यांना या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी विचारणा केली असता ग्रामस्थांना धमकी वजा मुजोर भाषा शैलीत उत्तरे देण्यात आल्याचे संजय गायकर, उपसरपंच सुभाष गायकर, शिवाजी आरोटेंसह स्थानिक ग्रामस्थांनी म्हटले आहे.पुरेसे जेवण मिळत नाही. भाजीपाला , अन्न धान्य निकृष्ट दर्जाचे वापरले जाते. अशा तक्रारी विद्यार्थी देखील करीत आहेत.

शासकीय आदिवासी वसतिगृहात मुलांना उपाशी ठेवण्याचा प्रकार उशिरा उघडकीस आला. असा प्रकार वारंवार होत आहे. मुलांना पुरेस जेवण मिळत नाही. भाजीपाला निष्कृष्ट दर्जाचा असतो. ठेकेदारास झालेल्या निंदनीय प्रकाराबाबत विचारणा केली असता उलट धमकीची भाषा वापरली जाते. प्रशासनाने लक्ष देत या मुलांना पोटभर जेवण आणि सर्व सुविधा मिळतील, अशी सोय करावी.
                                                                        – सुभाष गायकर, उपसरपंच

Back to top button