‘सीना’च्या पाण्यालाही राजकीय रंग, चार आमदारांचे दोनदा जलपूजन | पुढारी

‘सीना’च्या पाण्यालाही राजकीय रंग, चार आमदारांचे दोनदा जलपूजन

कोंभळी : पुढारी वृत्तसेवा : विधानसभा दूर असल्या तरी कर्जत-जामखेडमधील राजकीय वातावरण मात्र नेहमीप्रमाणेच तापलेले आहे. विषय कोणताही असो, त्यात पवार-शिंदेमध्ये श्रेयवादाची लढाई कायमच रंगताना दिसली. आता सीना धरणाच्या जलपूजनालाही राजकीय झालर लागली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी ‘सीना’चे जलपूजन केले, त्यानंतर, भाजपाकडून आमदार राम शिंदे आणि आमदार सुरेश धस यांनीही दुसर्‍यांदा जलपूजन केले. त्यामुळे आता एकाच धरणाचे दोन वेळा आणि तेही चार-चार आमदारांनी जलपूजन केल्याने राष्ट्रवादी आणि भाजपमधील श्रेयवादाची ही चढाओढ चर्चेचा विषय ठरली आहे.

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण नुकतेचं ओव्हर फ्लो झाले आहे. मात्र धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. सीना धरणात भोसे खिंड बोगद्यातून कुकडीचे ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आले होते. पावसाचे पाणी आणि कुकडीचे पाणी मिळून हे धरणं भरले आहे. धरण भरल्यानंतर आमदार रोहित पवार व राम शिंदे यांनी सोशल मीडियावर कुकडीच्या पाण्याने व पावसाने हे धरणं भरल्याची पोस्ट केली होती.

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार व आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी काल गुरुवारी सकाळी येथील धरणाच्या पाण्याचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या समवेत जलपूजन केले. तर माजी मंत्री आमदार राम शिंदे व आमदार सुरेश धस यांनीं सायंकाळी पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्यासमवेत जलपूजन केले. यावेळी कर्जत व आष्टी तालुक्यातील पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, एकाच धरणाचे दोन वेळा व आणि तेही चार आमदारांच्या हस्ते झालेले जलपूजन तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे. सीना धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर श्रेयवादाची ही लढाई अजून काही दिवस सुरूच राहणार असल्याचे दिसून येत आहे, जलपूजनातील ही चढाओढ पाहता लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या जिव्हाळाचा विषय असलेले हे सीना धरण नेमके राष्ट्रवादी की भाजपाच्या प्रयत्नामुळे भरले, याविषयी ग्रामस्थांमध्ये अजूनही संभ्रम कायम असल्याचेच बोलले जाते. येणार्‍या काळात हे राजकारण आणखी पेटणार आहे.

पाच-पाच ठिकाणी जलपूजनाचं वाईट वाटतयं!
भोसा खिंडीसह जे बंद पडलेलं काम चालू केले, यामधील 1200 दलघफू पाणी सीना धरणात येते, त्यामधील 700 दलघफ पाणी सीना प्रकल्पाला, तर 500 दलघफू पाणी मेहेकरीला ठरलेले आहे. मी ही योजना 97 टक्के पूर्ण केलेली असताना राम शिंदेंना जसा 2019 ला फटका बसला, तसा मला 2014 ला बसला, त्यामुळे या कामाचे उद्घाटन मी करू शकलो नाही. काम माझ्या कालावधीमध्ये झालेले असताना त्याचा दिंडोरा मी कधी पिटला नाही, आत्ता मात्र पाच पाच ठिकाणी त्याचे जलपूजन चालू आहे, याचे वाईट वाटते, असा चिमटा आमदार सुरेश धस यांनी आ. आजबे यांचे नाव घेता काढला.

कर्जत तालुक्यातील 21 गावांना सीना धरणातील पाण्याचा लाभ होणार आहे. शिवाय याच धरणातून सोडलेल्या पाण्याने शेजारील आष्टी तालुक्यातील मेहकरी धरणही भरुन घेण्यात आल्याने सीना धरण हे आष्टी तालुक्यातील काही गावांसाठीही खर्‍याअर्थाने वरदान ठरते आहे.
                                                                               -आमदार रोहित पवार

 

दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात 240 क्यूसेसने सुरू आहे, त्यामुळे अल्पशः पावसाचे पाणी व बहुतांश कुकडीचे पाणी या धरणामध्ये आलेले आहे, यामधून उपसा सिंचनाद्वारे मेहेकरी येथील प्रकल्प देखील या पाण्याने भरला आहे. दरवर्षी या धरणात कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याचा आमचा प्रयत्न असेल.
                                                                                -आमदार राम शिंदे

Back to top button