कोपरगाव: संवत्सर शिवारातील सोनवणे वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ; झटापटीत तीन जण जखमी | पुढारी

कोपरगाव: संवत्सर शिवारातील सोनवणे वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ; झटापटीत तीन जण जखमी

कोपरगाव: तालुक्यातील संवत्सर शिवारातील नऊ चारी येथे सात दरोडेखोरांनी चाकू, लोखंडी गज, लाकडी दांडके याचा धाक दाखवत मारहाण करून मध्यरात्री सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. यावेळी दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत तीन जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालय आणि शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरोड्यामुळे मोठी दहशत पसरली असून वाड्यावरील रहिवासी भयभित झाले आहेत. घटनास्थळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट देऊन तपासाची गती जलद केली आहे. घटनास्थळी ठसे तज्ञ आणि डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ सप्टेंबर रोजी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास नवचारी संवत्सर शिवारात गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या वस्तीजवळ शेतकरी अनिल हरिभाऊ सोनवणे यांची वस्ती आहे. वस्तीवर ६-७ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने चाकु, लोखंडी गज, लाकडी दांडके याचा धाक दाखवून घरात प्रवेश केला.

घर मालक अनिल सोनवणे यांच्यावर चाकू हल्ला करत घरातील त्यांचे आधार कार्ड, एटीएम कार्ड, पाकीट, मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कमेसह सुमारे दोन लाख 81 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी मारहाणीत दोन महिलांना देखील जखमी केले आहे. जखमींमध्ये अनिल हरिभाऊ सोनवणे (वय 54) सुगंधाबाई हरिभाऊ सोनवणे (वय 78) आणि सुनिता बबन सोनवणे (वय 52) यांचा समावेश आहे. या दरोड्यामुळे संवत्सर शिवारात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी कविता अनिल सोनवणे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सात अनोळखी इसमांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान सोनवणे कुटुंबीय रात्री झोपले असताना अनिल सोनवणे हे लघुसंखेसाठी उठले असता त्यांना खिडकी वाजल्याचा आवाज आला म्हणून ते पाहायला गेले असता त्यांना सात दरोडेखोर दिसून आले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केला असता दरोडेखोरांनी दमबाजी करत त्यांना गप्प बसा नाहीतर तुम्हाला मारून टाकू असे म्हटले. नंतर दरवाजा तोडून आत प्रवेश करून हा जबरी दरोडा टाकला. घटनास्थळी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, उपसरपंच विवेक परजणे आणि गावकऱ्यांनी भेटी देऊन सोनवणे कुटुंबीयांना धीर दिला. तसेच परिसरात रात्री पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली. पोलिसांनी दरोडेखोरांच्या तपासासाठी पथके पाठवले असून दरोडेखोरांचा तपास करून त्यांना लवकरच जेरबंद करू, असे आश्वासन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिले.

Back to top button