वीज कोसळल्याने दुकान जळून खाक | पुढारी

वीज कोसळल्याने दुकान जळून खाक

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा : येथून जवळच असलेल्या वैजापूर तालुक्यातील रामेश्वरनगर देवगाव शनी येथे दुकानावर वीज कोसळल्याने दुकान जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुलोचना चंद्रकांत पवार (रा. चेंडूफळ) हेे किराणा, कोल्ड्रिंक्स, टेलरिंग तसेच हॉटेल व्यवसाय करतात. रात्री नेहमीप्रमाणे 8 वाजता सुलोचना पवार या दुकान बंद करून घरी गेल्या. रात्री ठीक 9 वाजता त्यांच्या दुकाना शेजारी राहणार्‍या वाडी वस्तीवरील लोकांनी फोनवरून तुमच्या दुकानावर वीज कोसळल्यामुळे आग लागली असल्याची माहिती दिली.

माहिती मिळताच सुलोचना पवार व त्यांचे पती चंद्रकांत पवार यांनी दुकानाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या परिसरातील लोकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, आग काही आटोक्यात आली नाही.
या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून उसनवारी स्वरूपात पैसे घेऊन दुकान सुरू केले होते. या कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण याच दुकानावर चालत होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आज रस्त्यावर आलेले असून, त्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ही माहिती मिळताच बाजाठाण येथील तलाठी विनायक वासुंदेकर यांनी पंचांसमोर पंचनामा केला.

Back to top button