‘फेज टू’,‘अमृत’चे स्वप्न अधुरेच ! महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेवर दरवर्षी होतोय तीस कोटींचा खर्च | पुढारी

‘फेज टू’,‘अमृत’चे स्वप्न अधुरेच ! महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेवर दरवर्षी होतोय तीस कोटींचा खर्च

सूर्यकांत वरकड : 

नगर : केंद्र अन् राज्य शासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना आल्या. पण अजूनही त्यांची कामे रखडलेलीच. त्यामुळे नगरकरांना नियमित, स्वच्छ अन् पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी मिळण्याचे स्वप्न अजूनही अधुरेच आहे. पाणी वितरणाच्या नियोजनाचा अभाव अन् अवैध नळजोडांचा सुळसुळाट यामुळे नगरकरांचे स्वप्न भंगलेलेच आहे. त्यामुळे महापालिकेची पाणीपुरवठा योजना दरवर्षी तोट्यातच असते. दरवर्षी या योजनेवर तीस कोटींचा खर्च होतो. अन् पाणीपट्टी पोटी दहा कोटी रूपये येणे अपेक्षित असताना, अवघे पाच कोटी वसूल होतात, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ‘फेज टू’, ‘अमृत’मध्ये अडकलेल्या या पाणी योजनेचे ‘रडगाणे’ संपणार तरी कधी? असा प्रश्न नगरकरांना पडला आहे.

नगरपालिका असताना शहराला पिंपळगाव माळवी तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता. त्यानंतर शहराची लोकसंख्या वाढत गेल्याने पिंपळगाव माळवी येथून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडू लागला. त्यानंतर मुळा धरणावरून उपसा करून स्वतंत्र पाईपलाईनद्वारे शहराला पाणीपुरवठा होऊ लागला. आजमितीस 35 किलोमीटर अंतरावरून नगर शहरला पाणी आणले जात आहे. विळद येथे त्या पाण्याचे शुद्धीकरण करून पुन्हा पंपाद्वारे पाणी उचलून नगर शहरातील वसंतटेकडी येथे आणले जाते. त्यानंतर पाण्याचे शहरात वितरण केले जाते. शहरात केडगाव, कल्याण रोड, बुरूडगाव, सारसनगर, कोठला, आरटीओ, लालटाकी, सावेडी उपनगर आदी भागात पाण्याच्या अठरा टाक्या आहेत. वसंतटेकडी येथे पाणी आल्यानंतर शहरातील अठरा टाक्या पाण्याने भरल्या जातात. त्यानंतर शहराला रोटेशनप्रमाणे पाणीपुरवठा होतो. शहरात सुमारे 550 किलोमीटरची पाईपलाईन करण्यात आली आहे. त्यावर सुमारे एक हजार व्हॉल्व्ह आहेत.

शहरातील नागरिकांना रोटेशनप्रमाणे पाणी दिले जाते. शहरात आजमितीस सुमारे 62 हजार नळकनेक्शन आहेत. या नळकनेक्शन धारकांकडून वर्षाला पाणीपट्टी पोटी साधारण दहा कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. मात्र, पाणी पट्टीचे अवघे पाच कोटी वसूल होतात. तर, नगरकरांना पाणी पुरविण्यासाठी महापालिकेला सुमारे तीस कोटी रूपयांचा खर्च होतो. त्यात कर्मचार्‍यांचे वेतन, दुरूस्ती, पंप हाऊस यासह महावितरण वीजबिलाचा समावेश आहे. त्यामुळे त्याची पूर्तता करताना मनपाच्या नाकीनऊ येतात. दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणावर असलेले अनधिकृत नळकनेक्शन मनपाची डोकेदुखी ठरत आहेत. अनेक भागात अनधिकृत नळ कनेक्शनधारक आहेत. ते अधिकृत करून घेण्यासाठी महापालिकेने वेळोवेळी ‘सवलत योजना’ राबविली. मात्र, त्यास कधीही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या नळ कनेक्शन धारकांवर कारवाई करायचे प्रयत्नही राजकीय दबावामुळे यशस्वी झालेले नाहीत. या फुकट्यांमुळे पाणी योजना तोट्यात गेलेली असताना, त्याचे मात्र कोणालाही सोयसुतक नसल्याचेच दिसते.

ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा
मुळा धरणावरून शहराला पाणी आणताना त्याच पाईपलाईनद्वारे रस्त्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यात विळद, गवळीवाडा, शिंगवे, देहरे या गावांचा समावेश आहे.

असे आहेत पंप
ः मुळा धरण ः
725 एचपी दोन,
400 एचपी दोन,
ः विळद ः
600 एचपी पाच,
400 एचपी दोन

अजूनही मिळेना ‘अमृत’..!
गेल्या कित्येेक वर्षांपासून अमृत योजनेचे काम सुरू आहेत. मात्र, अद्यापि नगरकरांना अमृत योजनेचे पाणी मिळालेले नाही. अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम झाले आहे. पण, पंप बसविण्याचे काम बाकी आहे. अमृत योजना सुरू झाल्यानंतर शहराला पाणी वाढेल, असा विश्वास मनपा अधिकारी व्यक्त करतात.

Back to top button