श्रीरामपूर : रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू | पुढारी

श्रीरामपूर : रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपुरातील ओव्हर ब्रिजजवळ काल रात्री एका 22 वर्षीय तरुणाचा रेल्वे रुळावर मृत्यू झाला आहे. सदर मयत तरुण हा सूतगिरणी रोडवर राहणारा असून, त्याची मोटारसायकल नेवासा रोड येथील भुयारी पुलाजवळ आढळल्याने सदर तरुणाचा घात की अपघात झाला? याबाबत विविध तर्क वितर्क लढविले जात आहेत. अक्षय सुभाष दांगट असे या तरुणाचे नाव असून, तो श्रीरामपुरातील संगमनेर रोडवर मेसचा व्यवसाय करायचा.

सदर तरुण हा ग्रॅज्युएट असल्याचे समजते. त्याचा मृतदेह नेवासा रोडवर असणार्‍या ओव्हर ब्रीजजवळील रेल्वे रुळावर आढळून आला. त्याच्या अंगावर जखमा झालेल्या होत्या. हा तरुण रहायला सूतगिरणी रोडवर असल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्याची मोटारसायकल नेवासा रोडवर असणार्‍या अंडरग्राऊंड पुलाजवळ होती, असे अनेकांचे म्हणणे आहे. मयत अक्षय याचा व्यवसाय चांगला चालत होता. त्याने नुकतीच जागाही घेतली होती. त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button