पाथर्डी: स्मशानातील राखेला फुटले पाय, महिलांच्या अंत्यविधीनंतरच राख होते गायब | पुढारी

पाथर्डी: स्मशानातील राखेला फुटले पाय, महिलांच्या अंत्यविधीनंतरच राख होते गायब

करंजी, पुढारी वृत्तसेवा: पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील स्मशानभूमीतील राखेला चक्क पाय फुटल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. अंत्यविधीनंतर उरणारी राखच स्मशानभूमितून गायब होऊ लागली आहे. यामागे राखेतील दागिण्यांचे आमिष आहे की काही अंधश्रद्धेचा प्रकार आहे, या अनाकलनीय प्रश्नाने ग्रामस्थ पेचात पडले आहेत.

अधिक माहिती अशी की, करंजीतील स्मशानभूमित एका महिलेचा सोमवारी दुपारच्या सुमारास अंत्यविधी झाला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्या कुटुंबातील व जवळचे नातेवाईक सावडण्यासाठी स्मशानभूमीत गेले. अंत्यविधीच्या ठिकाणची अर्ध्याहून अधिक राख गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परंतु, घटना दुःखद असल्यामुळे याबाबत कोणीही जाहीरपणे वाच्यता केली नाही.

यापूर्वी देखील गावातील काही महिलांचा अंत्यविधी झाल्यानंतर स्मशानातून रात्रीतून राख गायब झाल्याच्या घटना या निमित्ताने पुढे आल्या आहेत. करंजी येथील उत्तरेश्वर मंदिरासमोरील स्मशानभूमितच बहुतांश अंत्यविधी केले जातात.

दरम्यान पुरुषांचा अंत्यविधी झाल्यानंतर मात्र राख गायब झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही. परंतु महिलेच्या अंत्यविधीनंतरच रात्रीतून राख गायब होण्याचे प्रकार वारंवार होऊ लागले आहेत. अशा घटनांमुळे संबंधित कुटुंबियांच्या भावनांना देखील ठेच पोहोचते. मृतांच्या अंगावरील सोने-चांदीच्या दागिण्यांच्या हव्यासापोटी असे प्रकार होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. आता स्मशानात देखील रखवालदार अथवा सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे का, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

Back to top button