कर्जत : भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी महसूलमंत्र्यांकडे बैठक | पुढारी

कर्जत : भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी महसूलमंत्र्यांकडे बैठक

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कुकडी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला आमदार रोहित पवार, खासदार सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी कुकडी कालवा अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु कालवा झाल्यापासून दुरुस्ती किंवा गेटची दुरुस्तीही करण्यात आली नव्हती. आमदार पवार यांनी सुमारे 350 कि. मी. चार्‍यांची स्वच्छता करुन 220 नवीन गेट बसविले. येडगाव ते कर्जतपर्यंत कालव्यातील दगड काढून खोलीकरण केले.

त्यामुळे नुकत्याच सोडलेल्या आवर्तनातून 107 बंधारे भरून घेण्यात आले. शिवाय भोसे खिंडीच्या माध्यमातून सीना धरणही पूर्ण भरले आहे. परंतु कुकडीच्या भूसंपादनाचा विषय मात्र अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आमदार पवार यांच्या प्रयत्नातून तब्बल 95 कोटी रुपयांचा मोबदला शेतकर्‍यांना मिळाला. 48 कोटी रुपये इतर कामांसाठी असे एकूण 143 कोटी रुपये मंजूर करुन आणले. तसेच नगर-करमाळा या राष्ट्रीय महामार्गाचे भूसंपादन करुन शेतकर्‍यांना तातडीने योग्य मोबदला मिळण्यासाठीही आमदार पवार यांनी प्रयत्न केले.
दरम्यान, कुकडी कालव्यासाठी केलेल्या भूसंपादनाचा मोबदला अद्यापही अनेक शेतकर्‍यांना मिळालेला नाही.

तोही मिळवून देण्यासाठी आमदार पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी गेल्याच आठवड्यात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानुसार महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक होऊन भूसंपादनाचा मोबदला देताना येणार्‍या अडचणी सोडवण्याबाबत चर्चा झाली. तसेच हा विषय सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला.

Back to top button