पुणतांबेत गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक | पुढारी

पुणतांबेत गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण काशी संबोधल्या जाणार्‍या पुणतांबा येथे गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत सुरू असताना, तीन मंडळांच्या वाहनांवर अचानक दगडफेक झाल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. स्थानिक पुढारी व पोलिस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेत तिघांचे डोके फुटल्याचे सांगण्यात आले. याप्रकाराबाबत कोणीही तक्रार दाखल केली नसली तरी ज्यांनी विसर्जन मिरवणुकीत गोंधळ घातला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितले.

गणेश विसर्जन मिरवणुकीला सायंकाळी 5 वाजता सुरुवात झाली. मुख्य नेहरू चौकात रात्री 8 वाजता विसर्जन मिरवणूक एका मागून एक शांततेत येत असताना तीन मंडळांमध्ये पुढे जाण्यावरून कुरबुरी सुरू होत्या. त्यातच अज्ञाताने वाहनावर दगड फेकल्यामुळे वाहनांचे नुकसान झाले. यानंतर वाद आणखी वाढून इतर दोन मंडळांच्या वाहनांवरही दगडफेक झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला. गणेश भक्तांची एकच पळापळ झाली. सरपंच डॉ. धनंजय धनवटे, विकास आघाडीचे नेते धनंजय जाधव, उपसरपंच महेश चव्हाण यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तरी वाद सुरू होते. पोलिसांच्या उपस्थितीत गणेश विसर्जन झाले. गावात दगडफेकीची घटना झाल्याचे वृत्त समजतात सर्वत्र पळापळ सुरू झाली. दगडफेकीमुळे विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले.

पोलिस ताफा हजर
शिर्डी विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी दिलीप सातव व पो. नि. सुनील गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा आल्यामुळे गर्दी पांगविण्यात आली. पोलिसांनी सूत्रे हाती घेत विपरित घटना घडू नये, याची खबरदारी घेतली.

Back to top button