नदीत बुडणार्‍या चौघांना वाचविण्यात यश | पुढारी

नदीत बुडणार्‍या चौघांना वाचविण्यात यश

संगमनेर शहर/झरेकाठी : पुढारी वृत्तसेवा : गणपती विसर्जनासाठी गेलेला भाचा बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी दोन मामांसह त्यांच्या मित्रांनीही पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा वेग जास्त असल्याने वाहून चाललेल्या या चारही तरुणांचे दैव बलवत्तर असल्याने उपस्थित तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या तरुणांना बुडता-बुडता वाचविण्यात यश आल्याने सर्वांशी सुटकेचा निःश्वास सोडला. शुक्रवारी दुपारनंतर चणेगाव येथील प्रवरानदी पात्रात गणपती विसर्जनसाठी परिसरातील नागरिक घरगुती गणेशासह गणेश मंडळांचे गणपती घेऊन येत होते. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गणपती विसर्जन सुरु असताना गौरव वडितके हा तरुण पाण्याचा वेग जास्त असल्याने पाण्यात बुडू लागला.

आपला भाचा गौरव पाण्यात बुडत असल्याचे पाहून जिवाची पर्वा न करता मामा मयूर दिलीप शेळके व बाळासाहेब चिमाजी शेळकेंसह मित्र योगेश उत्तम साळुंखे यांनी पाण्यात उड्या मारून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गढूळ पाणी व वेगवान प्रवाहामुळे हे चौघेही बुडत असल्याचे पाहून मेजर सचिन शिवाजी बर्डे, विकास सोनवणे व कैलास दुकळे यांनी प्रसंगावधान दाखवून क्षणार्धात पाण्यात उड्या घेत शोधाशोध करून या तरुणांना भागवत साळुंखे, सोमनाथ ढमक, उत्तम साळुंखे, लहानू खेमनर, लक्ष्मण आहेर, पुंजा राजणार, बाळासाहेब पावडे, शंकर गेणू खेमनर, शंकर आहेर आदींसह तेथे उपस्थित गणेश मंडळांच्या तरुणांच्या मदतीने पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या चौघांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या चौघांची प्रकृती सुधारली असून, त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

नदीकाठी गोंधळ..!
बुडणार्‍या भाच्यास वाचविण्यासाठी तिघांनी पाण्यात उड्या मारल्या. परंतु, चौघेही पाण्यात दिसेनासे झाल्याने प्रवरा काठावर एकच गोंधळ उडाला. आरडाओरडा सुरू झाला.

Back to top button