अतिक्रमणप्रश्नी कुणालाही पाठिशी घालू नका, महसूलमंत्री विखे पाटील | पुढारी

अतिक्रमणप्रश्नी कुणालाही पाठिशी घालू नका, महसूलमंत्री विखे पाटील

लोणी : पुढारी वृत्तसेवा : अतिक्रमणामुळे बंदिस्त झालेल्या चर व नाल्यांचे नैसर्गिक पाणी प्रवाह पूर्ववत करा, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. अतिवृष्टीमुळे जलमय झालेल्या भागाची पाहणी करून, ना. विखे पा. यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या. विविध गावांमधून आलेल्या तक्रारींवरुन अतिक्रमण करून, पाण्याचे प्रवाह बंद करणार्‍यांविरुध्द कायदेशीर कारवाई करा, असे आदेश ना. विखे यांनी दिले.

लोणीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीत शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक गावांमध्ये स्थानिक रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकार्‍यांसमवेत सर्वाधिक जलमय झालेल्या पाथरे, हनुमंतगाव या गावांचा पाहणी दौरा केला. या दौर्‍यामध्ये स्थानिक नागरिकांचे प्रश्नही त्यांनी जाणून घेतले.

प्रामुख्याने चरांचे, नाल्यांचे नैसर्गिक स्त्रोत बंदिस्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये साठले. यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. पाण्यामुळे पीक सडून गेल्याने हाती आलेले पीक वाया गेल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे. यासर्व बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ना. विखे यांनी सर्व गावांमध्ये ओढे, नाल्यांमध्ये झालेले अतिक्रमण तातडीने काढून टाकून पाण्याचे प्रवाह पूर्ववत करण्यासाठी नळ्या टाकण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम अधिकार्‍यांना दिल्या.

अनेक रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी ना.विखे यांनी केली. तात्पुरती मदत म्हणून या ग्रामस्थांना ना. विखे यांच्या हस्ते किराणा सामान देण्यात आले. या पाहणी दौर्‍यामध्ये जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार कुंदन हिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास वर्पे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे व स्थानिक पदाधिकारी व नुकसानग्रस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हद्दनिश्चिती करण्याच्या सूचना
महसूल प्रशासनाने सर्व ओढे, नाल्यांची पाहणी करुन, त्यांची हद्द निश्चित करण्यात यावी. कोणाचेही अतिक्रमण असले तरी, त्याला पाठीशी घालू नका, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना यावेळी दिले.

Back to top button