शिवसेनेकडून शिंदेसेनेची कोंडी | पुढारी

शिवसेनेकडून शिंदेसेनेची कोंडी

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगरकरांनी मोठी गर्दी करीत शुक्रवारी (दि. 9) गणरायाला निरोप दिला. मात्र, मानाच्या स्थानावरून शिवसेनेचे शिंदे व ठाकरे गट समोरासमोर आल्याने वाद निर्माण झाला होता. मानाच्या मंडळानंतर शिंदे गटाचा डीजे व गणपती मिरवणुकीत सहभागी झाल्याने ठाकरे गटाने विरोध केला. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढील अनर्थ टळला. मानाच्या पहिल्या विशाल गणपतींनंतर कोणती मंडळे मिरवणुकीत सहभागी होतील, याकडे नगरकरांच्या नजरा लागल्या होत्या. पोलिसांनी देखील अखेरच्या दिवसापर्यंत निर्णय गुलदस्त्यात ठेवला होता. ग्रामदैवत श्री विशाल गणपतीची मिरवणूक सहा वाजता दिल्लीगेटच्या बाहेर पडली. शुक्रवारी दुपारी रामचंद्र खुंटावरून मिरवणुकीला सुरुवात केली. मानाच्या मंडळांनंतर 14 व्या स्थानी ठाकरे गटाला सहभागी करण्यात आले होते. शिंदे गटाच्या मंडळाला सर्वात शेवटी स्थान देण्यात आले होते.

दाळमंडई येथे मिरवणूक आली असता, तेराव्या मंडळानंतर शिंदे गटाच्या मंडळाने घुसखोरी केली. त्यास शिवसेनेच्या मंडळाने तीव्र विरोध केला. ठाकरे गट व शिंदे गटाचे पदाधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकले. काही काळ शाब्दिक युद्धही रंगले. पोलिसांनी मध्यस्थी केली. एक-दीड तास दोन्ही मंडळे दाळमंडईत उभी होती. शिंदे गट माघार घेण्यास तयार नव्हता. मात्र, मिरवणुकीत शिंदे गटाच्या पुढे शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांचे समझोता गणेश मंडळ होते. शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचे नीलकमल मंडळ होते. या मंडळांनी जागेवर थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या डीजेसमोर ठाकरे गटाची दोन मंडळे व मागे ठाकरे गटाचा डीजे अशी स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी सर्व मंडळांना सुरक्षा कवच पुरविले होते. अखेर शिंदे गटाने मागे जाण्याचा निर्णय घेतल्याने समझोता व नीलकमल ही मंडळे पुढे काढण्यात आली. त्यानंतर मानाच्या वादावर पडदा पडला.

मंडळांसह डीजे चालकांवर गुन्हे
गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविण्यावर पोलिसांकडून बंदी घालण्यात आली होती. मात्र, मिरवणुकीत काही मंडळांनी डीजे वाजविल्याने पोलिसांनी आवाजाच्या नोंदी घेतल्या. पोलिसांकडून अहवाल तयार करण्यात आला असून, सोमवारी न्यायालयात सादर केला जाणार आहे. मिरवणुकीतील सात ते आठ मंडळांचे पदाधिकारी व डीजे चालक यांच्यावर दंडात्मक स्वरूपाची कारवाई पोलिस प्रशासनाकडून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Back to top button