नगरला स्वतंत्र विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील; विद्यापीठ उपकेंद्र उद्घाटन कार्यक्रम | पुढारी

नगरला स्वतंत्र विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील; विद्यापीठ उपकेंद्र उद्घाटन कार्यक्रम

नगर, पुढारी वृत्तसेवा: विकेंद्रित प्रशासन, विकेंद्रित शिक्षण हाच राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणाचा गाभा असून पुढील काळात आशाच प्रकारे काम केले जाईल. अहमदनगरला उपकेंद्रासोबतच स्वतंत्र विद्यापीठ देण्याचा मानस असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर येथील उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन मंगळवारी बाबुर्डी घुमट येथे झाले. त्यानंतर नगर येथील न्यू आर्टस महाविद्यालयाच्या राजर्षी शाहु महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, उपकेंद्राचे संचालक डॉ. नंदकुमार सोमवंशी, विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी चारुशीला भिडे, सिनेट सदस्य राजेंद्र विखे, अभय आगरकर, भाजप शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, प्राचार्य डॉ. भास्कर झावरे, बाबुर्डी घुमटच्या सरपंच नमिता पंचमुख, उपसरपंच तानाजी परभाणे यावेळी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करीत असताना केलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करीत आहोत. ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या शिक्षण पद्धतीचा आपण अवलंब करीत होतो. आपली शिक्षण पदध्ती ही गुरूकुल शिक्षण पद्धती असून, आपले शिक्षण कर्तव्यप्रधान होते. पारंपरिक बीए. बीकॉम, बीएस्सी अशा अभ्यासक्रमातून बाहेर पडायचे आहे. त्यासाठी आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवयाचे असून, त्यामुळे बेरोजगार भत्ता मागण्याची वेळ येणार नाही. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण, कौशल्याधीष्टित शिक्षण आणि एकत्रित पदवी घेण्याची संधी असे पर्यायी शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.

विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, आज उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन झाल्याने खूप आनंद होत आहे. त्यासाठी सर्व सिनेट सदस्य व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बहुमोल सहकार्य केले. बाबुर्डी ग्रामपंचायतीने 82 एकर गायरान जागा विद्यापीठाला उपलब्ध करून दिली हा गावाचा मोेठेपणा आहे. उपकेंद्र शैक्षणिक विकासाचे केंद्र म्हणून पुढे येईल.प्रास्ताविक आयोजन समितीचे प्रमुख राजेश पांडे यांनी केले. तर, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी आभार मानले.

राजकारणातील धुरंधर कर्डिले

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बोलत असताना त्यांनी सर्वांची नावे घेतली. त्यात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा नामउल्लोख राजकारणातील धुरंधर असा केला. त्यावेळी व्यासपीठावरील मंत्री विखे आणि कर्डिले यांनी एकमेकांकडे पाहुन स्मित हस्य केलेे.

अडीच वर्षे केंद्राशी असहकार

गेल्या अडीच वर्षात केंद्राशी असहकार होता. त्यामुळे शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाली नाही. नव्याने सुरू होणार्‍या विद्यापीठ उपकेंद्रामध्ये संशोधनावर भर असणार आहे. आज संशोधनामुळे जगात आपली मान उंचावली आहे. भारताने जगात साठ देशांना व्हॅक्सीन पुरविली. विकास दरामध्ये आपण इंग्लंडलाही मागे टाकले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

प्राध्यापकांच्या समस्या म्हणजे महाविद्यालयाच्या समस्या नव्हे

पुण्यामध्ये 16 महाविद्यालयाची एकत्रित बैठक घेऊन त्यांच्या समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. दसर्‍यानंतर नगरमध्येही सर्व महाविद्यालयाची बैठक घेऊ. मात्र, प्राध्यापकांच्या समस्या म्हणजे महाविद्यालयाच्या समस्या नाहीत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Back to top button