अकोलेमध्ये मटका बुकीवर पोलिसांचा छापा | पुढारी

अकोलेमध्ये मटका बुकीवर पोलिसांचा छापा

अकोले, पुढारी वृत्तसेवा: शहरातील कारखाना रोडला बाबा आभाळेच्या मटका पेढीवर छापा मारून 2 हजार 250 रुपये मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले. याबाबत अकोले पोलिस स्टेशनला, पो. ना. लक्ष्मण चिंधू खोकले (नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अ.नगर) यांनी फिर्याद दिली असून यात म्हटले आहे की, स्थानिक गुन्हेशाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अकोले शहरातील कारखाना रोड, हासे कॉम्प्लेक्स, अकोले येथे दोन शेजारील वेगवेगळया गाळयामध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी छापा घातला असता भाऊराव गांडाळ व मोरेश्वर चौधरी हे दोघे लोकांना चिठ्ठ्यांवर आकडे लिहून देऊन त्यांचे कडून पैसे घेत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी भाऊराव रामनाथ गांडाळ (वय 32, रा. सावरचोळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), मोरेश्वर शांताराम चौधरी (वय 25, रा. अगस्ती, हायस्कूलसमोर, अकोले, जि. अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या दोघांकडे अधिक चौकशी केली असता सदरचा धंदा हा आम्ही बाबा आभाळे (रा. माळीझाप, ता. अकोले) याच्या अर्थिक फायद्यासाठी घेत असल्याचे सांगितले. अकोले पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा छापा टाकताना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोले पोलिस स्टेशनचे पो. हे. कॉ. महेश सीताराम आहेर व पो, कॉ. विजय तबाजी आगलावे यांना मदती कामी सोबत घेऊन छापा मारला आहे.

Back to top button