खोटा दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा; पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना मागणीचे निवेदन | पुढारी

खोटा दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा; पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना मागणीचे निवेदन

नेवासा; पुढारी वृत्तसेवा: समाज हितासाठी आंदोलन करणार्‍या, माहितीच्या अधिकाराचा वापर करणार्‍या व अधिकार्‍याच्या वाहनांची हवा सोडण्याचे आंदोलन दडपण्यासाठी व अधिकारी मुख्यलयी ठिकाणी न राहणार्‍या विरोधात काम करणार्‍या एका सामाजिक कार्यकर्त्यावर सूडबुद्धीने अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी माहिती अधिकार महासंघानेे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

माहिती कार्यकर्ते सोपान रावडे यांनी ग्रामसेवक, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, शिक्षक, मुख्यध्यापक, आरोग्य सहाय्यक, कृषी सहायक आदी शासकीय अधिकारी हे मुख्यालयी रहात नसल्याने वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन तक्रारी केल्या होत्या. त्यात कांगोणी येथील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक मुख्यालयी ठिकाणी रहात नाहीत. त्यांना या कारवाईतून का वाचवता, हे निदर्शनास आणून दिले होते.

त्याबाबत खोट्या माहितीचा ग्रामसभेचा ठराव मंजूर करणार्‍या सरपंच अप्पासाहेब शिंदे यांनी लोकांचे मने भडकून दिली. त्याचा राग मनात धरून कांगोणी येथील सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांच्या कुटुंबातील सदस्यांना कांगोणीचे सरपंच अप्पासाहेब शिंदे व जमावातील लोकांनी घरात घुसून मारहाण केली आणि उलट त्यांच्यावर खोट्या आरोपाखाली अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये जिल्ह्यातील शिक्षक, तलाठी, आरोग्य, ग्रामसेवक, महसूल, कृषी आदी संघटनांचा अप्रत्यक्ष सहभागी असण्याची शक्यता आहे. याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश कर्पे, दीपक पाचपुते, सुरेंद्र गांधी, शोभा पातरे, सचिन एकाडे, ईश्वर रायकर आदींनी जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.

Back to top button