

नगर, पुढारी वृत्तसेवा: मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणार्या जिल्हा परिषदेत वीज पुरवठा बंद झाल्यानंतर कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने त्याचा थेट परिणाम होतो. सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असल्याने, प्रशासकीय कामकाजही ठप्प झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी प्रशासकीय इमारतीत कायमस्वरुपी वीजपुरवठा व्यवस्था करण्यासंदर्भात एक्स्प्रेस फिडरसाठी पुढाकार घ्यावा, असा सूर कर्मचारी वर्तुळातून आळवला जात आहे.
जिल्हा परिषदेमध्ये 14 पेक्षा अधिक विभाग आहेत. यामध्ये संगणकीय कामकाज मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे प्रशासकीय इमारतीत वीज पुरवठा हा महत्त्वाचा विषय आहे. असे असताना जिल्हा परिषदेचा वीजपुरवठा बंद झालाच, तर एकच जनरेटरची व्यवस्था आहे. त्यावरही संपूर्ण प्रशासकीय इमारतीचा विद्युतभार शक्य नाही. त्यामुळे केवळ मिटींग हॉलमध्येच जनरेटरद्वारे वीजपुरवठा सुरू असतो. तर, इतर विभागात मात्र कामकाज बंद ठेवावे लागते, असे वास्तव चित्र आहे. सोमवार दि. 5 रोजी सकाळी साधारणतः 11 वाजताच जिल्हा परिषदेचा वीजपुरवठा बंद झाला. त्यामुळे आरोग्य वगळता इतर बहुतांशी विभागातील कामकाज बंद पडले होते. तर, जिल्हाभरातून कामांसाठी आलेल्या नागरिकांनाही ताटकळत थांबावे लागले.