श्रीगोंदा पालिकेत आघाडीत बिघाडी; गटनेतेपदी गणेश भोस यांची निवड | पुढारी

श्रीगोंदा पालिकेत आघाडीत बिघाडी; गटनेतेपदी गणेश भोस यांची निवड

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा: श्रीगोंदा नगरपालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकामध्ये अंतर्गत वाद झाल्याने, गटनेते पदावरून मनोहर पोटे यांना हटवून, त्या जागी गणेश भोस यांची निवड झाल्याबाबतचा ठराव जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूकपूर्व आघाडी केली होती. या निवडणुकीत आघाडीचे नऊ उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी या नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत आघाडीच्या गटनेतेपदी मनोज उर्फ मनोहर रामदास पोटे यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु, गटनेते पोटे हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत आहेत. आघाडीचे कोणतेही निर्णय बहुमताने घेतले जात नाहीत.

त्यामुळे गटनेत्यांविषयी तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. आघाडीतील बहुमत गटनेत्यांच्या विरोधात गेल्याने गटनेता बदलण्यासाठी आघाडीच्या नगरसेवकांची स्वतंत्र बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला गटनेते मनोहर पोटे हे गैरहजर राहिले. बैठकीला नऊपैकी पाच नगरसेवक हजर असल्याने, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या गटनेतेपदी गणेश बाबासाहेब भोस यांची बहुमताने नेमणूक करण्यात आली आहे.

याबाबतचा ठराव जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आला असून, त्यावर सीमा प्रशांत गोरे, संतोष पोपट कोथिंबीरे, निसार जाफर बेपारी, सोनाली हृदय घोडके आणि गणेश बाबासाहेब भोस या पाच नगरसेवकांच्या सह्या आहेत. दरम्यान, आघाडीच्या पाच नगरसेवकांनी सध्या बहुमताच्या आधारे सादर केलेला नवीन गटनेता नियुक्तीचा ठराव मंजूर करायचा की, त्यावर सुनावणी घ्यायची, याबाबतचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना आहे. त्यावर ते काय निर्णय घेतात, यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.

गटनेतेपदी माझी निवड : भोस
मनोहर पोटे यांच्या मनमानी कारभाराला नगरसेवक वैतागले होते. ते कोणालाही विश्वासात घेऊन काम करत नसल्याने, त्यांना गटनेता पदावरून हटविण्याचा आम्ही पाच नगरसेवकांनी निर्णय घेतला आहे. आता गटनेते पदी माझी निवड झाली असल्याचे गणेश भोस यांनी स्पष्ट केले.

यामागचे कारण वेगळेच : पोटे
श्रीगोंदा नगरपालिकेत काँगे्रस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीत सुरू असलेल्या अंतर्गत बंडाळीबाबत बोलताना नगरसेवक मनोहर पोटे म्हणाले की, आतापर्यंत ज्या काही घडामोडी झाल्या आहेत, त्यामागे वेगळेच कारण आहे. आपल्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांबाबत योग्य वेळी पुराव्यासह उत्तर देऊ.

 

Back to top button