खुणेगाव वनराईत मृतदेह आढळला | पुढारी

खुणेगाव वनराईत मृतदेह आढळला

कुकाणा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा-शेवगाव रोडवरील खुणेगाव-नागापूर शिवारातील वनराईमध्ये एक 65 वर्षीय व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खुणेगाव येथील पोलिस पाटील मोहन संभाजी पवार यांनी पोलिसांना कळविले की, नागापूर खुणेगाव शिवारात वन जमिनीत 60 ते 65 वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही खबर मिळताच पोलिस निरीक्षक विजय करे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला.

मृतदेहाच्या शेजारी कीटकनाशक औषधाची रिकामी बाटली आढळून आली. त्यावरून मृत व्यक्तीने औषध प्रशासन केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. ओळख पटण्यासाठी कुठलाही पुरावा मृतदेहावरील कपड्यांमध्ये आढळून आला नाही. इतर पोलिस ठाण्यांमध्ये मिसिंगबाबत विचारपूस केली असता अशा वर्णनाची व्यक्ती श्रीरामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाल्याची तक्रार 25 ऑगस्ट रोजी दाखल झाली होती. संबंधितांच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावण्यात आले. मृतदेहावरील कपडे, पायातील बूट, जवळ असलेली पिशवी व कमरेचा कडदोरा यावरून नातेवाईकांना मृतदेहाची ओळख पटली. संबंधिताचे नाव मच्छिंद्र सखाराम ढोले (रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर), असे आहे.

टोका येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. एस. ए. पवार व डॉ. एस. के. सुकासे यांनी घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन करून नेवासा पोलिसांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी नेवासा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास फौजदार बाळकृष्ण ठोंबरे करीत आहेत.

Back to top button