श्रीगोंदा : अजित पवारांनी काढले पालिकेचे वाभाडे | पुढारी

श्रीगोंदा : अजित पवारांनी काढले पालिकेचे वाभाडे

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार स्पष्ट आणि सडेतोड, कुणाचाही मुलाहिजा न बाळगता चुकीला चूक म्हणणारे नेते आहेत. याच स्वभावाचा प्रत्यय श्रीगोंदेकरांना आला. श्रीगोंदा शहरातील रस्त्याची झालेली दुरवस्था, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले रस्ता दुभाजकाच्या कामावरून अजित पवारांनी पालिका कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले. ते म्हणाले, ‘कधी आलो तरी दुभाजकाचे काम चालूच असते.’ राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास विरोधी पक्षनेते अजित पवार श्रीगोंदा तालुक्याच्या दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहून नाराजी व्यक्त केली.

सकाळी मढेवडगाव, त्यानंतर पारगावमार्गे श्रीगोंदा शहरात येताना रस्त्याची लागलेली पुरती वाट, रस्ता दुभाजकाचे अर्धवट काम याकडे पवारांचे लक्ष गेले. त्याची नोंद घेत त्यांनी आपल्या भाषणात या सगळ्या अनागोंदी कारभाराचा उहापोह केला. श्रीगोंदा शहरातील रस्ते खड्ड्यात आहेत की, खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही. केव्हाही आले, तरी रस्ता दुभाजकाचे काम चालूच असते. इतके मोठे शहर अन् त्याच कुठलंच नियोजन नाही. रस्ता दुभाजकावर झाडे लावलेली नाहीत.

कामात मिळणार्‍या टक्केवारीकडे न पाहता शहराच्या विकासासाठी प्रयत्न करा. या संपूर्ण कामांची ज्या मुख्याधिकार्‍यांकडे जबाबदारी आहे, ते काय करतात? त्यांनी यात सुधारणा करणे गरजेचे आहे, असे थेटपणे सांगत पालिका कारभाराचे त्यांनी वाभाढे काढले. विशेष बाब म्हणजे सभास्थळी नगराध्यक्षा शुभांगी पोटे आणि गटनेते मनोहर पोटे हेही उपस्थित होते.

…आता तरी सुबुद्धी येईल
पारगाव रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. वडाळी रस्त्याचे दोनच महिन्यांत तीन तेरा वाजले आहेत. आज खुद्द विरोधी पक्षनेते अजित पवारांनाच या खराब रस्त्याचा फटका बसल्याने त्यांनी पालिका कारभारावर खडेबोल सुनावले. आतातरी या रस्त्याची दुरुस्ती व इतरही कामे दर्जेदार होण्यासाठी पालिका प्रशासन आणि पदाधिकार्‍यांनी सुबुद्धी येईल, अशी आशा करायला हरकत नसावी.

Back to top button