कर्तृत्व असणार्‍यांना नक्कीच संधी : विरोधी पक्षनेते अजित पवार | पुढारी

कर्तृत्व असणार्‍यांना नक्कीच संधी : विरोधी पक्षनेते अजित पवार

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : सध्याचे राजकारण खूप वेगाने बदलत आहे. उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पक्षात कोण नवीन, कोण जुना हे न पाहता ज्याचे कर्तृत्व असेल, कष्ट असतील, त्याला नक्की संधी मिळेल, असा सूचक इशारा देत श्रीगोंद्याबाबत तुम्हाला काय करायचे ते करा, अधिकार तुम्हाला आहेत. पण एकट्याच्या ताकदीवर लढले, तर समोरच्या व्यक्तीचा फायदा होऊ नये. त्यामुळे समंजसपणाची भूमिका घ्या, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांचा अभिष्टचिंतन सोहळा व राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशास प्रमुख पाहुणे म्हणून पवार उपस्थित होते.

त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार राहुल जगताप होते. व्यासपीठावर माजीमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अशोक पवार, आमदार नीलेश लंके, आमदार संग्राम जगताप, राजेंद्र फाळके, रमेश थोरात, सीताराम गायकर, बाबासाहेब भोस, सिद्धार्थ मुरकुटे, सावित्री साठे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, एकनाथ आळेकर, बाळासाहेब हराळ, राजेंद्र गुंड, संजय जामदार, घनश्याम शेलार, दीपक भोसले, बाळासाहेब दुतारे, मितेश नाहाटा उपस्थित होते.

पवार म्हणाले की, राज्यातील बाजार समितीत शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्यास आमचा विरोध नाही. शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार द्यायचा असेल, तर निवडणूक खर्च वाढणार आहे. हा खर्च बाजार समित्यांना परवडणारा नाही. शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार द्यायचा असेल, तर राज्य सरकारने निवडणूक खर्चाची जबाबदारी घ्यावी. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी कोरोनाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून चांगले काम केले. या कामाचे जगाने कौतुक केले. राष्ट्रवादीच्या नवीन आमदारांचे काम चांगले आहे. त्यामुळे त्यांना भविष्य काळ चांगला आहे.

माजी आमदार राहुल जगताप म्हणाले की, बाळासाहेब नाहाटा हे श्रीगोंद्यातील किंगमेकर आहेत. पण ते कोणत्या पक्षात आहेत, हे दुर्बिणीतून पाहूनही कळत नव्हते. आता ते राष्ट्रवादीत आल्याने आमची ताकद वाढली असून, त्यांचा नक्की फायदा होणार आहे. राज्यात सत्ता असो अगर नसो अजित पवार मागे आहेत. त्यामुळे आम्ही भीत नाही. फक्त आम्हाला श्रीगोंद्यात स्वबळावर लढण्याची परवानगी द्या.
सभापती बाळासाहेब नाहाटा म्हणाले की, अजित पवार हे राज्याला उंचीवर नेणारे नेते आहेत.

त्यांच्यामुळे मला राज्य बाजार समितीवर काम करण्याची संधी मिळाली. सन 2014 ला स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या नेतृत्वाखाली राहुल जगताप यांना आमदार केले. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचा आमदार होण्यासाठी जीवाचे रान करणार आहे. तालुक्यात पक्षवाढीसाठी आपण अभियान राबवणार आहोत. नाहटा यांच्यासमवेत युवा नेते शरद नवले यांनीही राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश केला. प्रास्ताविक टिळक भोस यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड, रवी पवार यांनी केले. आभार भरत नाहटा यांनी मानले.

मितेश नाहटा यांच्या नियोजनाची चर्चा
सभापती बाळासाहेब नाहटा यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम जोरदार झाला. गेल्या आठवडाभरापासून कार्यक्रमाची तयारी सुरू होती. कार्यक्रमाला अजित पवार येणार का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र पवार यांनी कार्यक्रमाला हजेरी लावून नाहटा यांचे कौतुक केले. हा सगळा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात मितेश नाहटा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या उत्तम नियोजनाची कार्यक्रमस्थळी चर्चा होत होती.

सगळी ताकद मागे उभी
अजित पवार म्हणाले, बाळासाहेब नाहाटांना राज्य बाजार समितीवर काम करण्याची संधी दिली आहे. त्यांनी योग्य पध्दतीने काम करावे. सर्व ताकद मागे उभी करणार आहे. राज्य बाजार समिती महासंघाच्या माध्यमातून त्यांना काम करण्याची मोठी संधी आहे.

Back to top button