‘लम्पी’चा राहुरीत 20 जनावरांना विळखा, 11 हजार जनावरांना दिली लस | पुढारी

‘लम्पी’चा राहुरीत 20 जनावरांना विळखा, 11 हजार जनावरांना दिली लस

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यात तीन गावांमध्ये तब्बल 20 जनावरे लम्पी आजाराच्या विळख्यात सापडल्याचे निष्पन्न झाल्याने पशू पालकांमध्ये निराशेचे चित्र दिसत आहे. दरम्यान, पशू वैद्यकीय विभागाने आजाराची तातडीने दखल घेत पाच किलोमीटर अंतरावरील 11 हजार जनावरांना तातडीने लस दिली. गोपालक लम्पी आजाराने संकटात सापडले आहेत. पशू वैद्यकीय विभागाने जनावरांच्या स्वच्छतेबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यामध्ये लम्पी आजाराचे थैमान वाढत आहे. जनावरांच्या बाजारावर बंदी लादल्यानंतर गावोगावी तपासणी व लस टोचणी मोहीम पशू वैद्यकीय विभागाने सुरू केली.

याबाबत तालुका पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरप्रसाद माने यांनी सांगितले की, मानोरी व मुसळवाडी गावामध्ये प्रत्येकी जनावरे लम्पी आजाराने बाधित असल्याचे आढळले. चांदेगावामध्ये 20 जनावरे बाधित आढळले. सर्व जनावरांची काळजी घेतली जात आहे. संबंधित गावाच्या 5 कि. मी. त्रिज्येनुसार लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. 20 हजार जनावरांपैकी 11 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले. लम्पीचा मानवी जीविताला कोणताही धोका नाही. या आजारामध्ये जनावरांचे मृत्यूचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे गोपालकांनी काळजी करू नये. जनावरांबाबत कोणतीही अडचण असल्यास तातडीने पशू वैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पशू वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, राहुरी परिसरात लम्पीचा विळखा वाढत असल्याने गोपालक चिंताक्रांत झाले आहेत. हा आजार विषाणू जन्य व संसर्गजन्य असल्याने शेतकर्‍यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या आजारामध्ये मृत्यू प्रमाण कमी असले, तरीही दुभत्या संकरित गायींच्या उत्पादनात होणारी घट, तर दुसरीकडे औषधांचा अधिकचा खर्च हा गोपालकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
राहुरीमध्ये 20 जनावरांना लम्पीची बाधा झाल्याचे समजताच संसर्ग होऊ नये म्हणून पशू वैद्यकीय विभागाकडून दखल घेतली जात आहे. परिघातील 11 पैकी 9 हजार 87 जनावरांचे लसीकरण झाले आहे. पशू वैद्यकीय विभागाला मागणीप्रमाणे लस उपलब्ध होत आहे.

मिश्रण तयार करून फवारणी..!
करंज व निम तेल एकत्र करीत त्यामध्ये साबण किंवा शॅम्पू टाकत मिश्रण तयार करावे. तयार झालेल्या द्रव्याची फवारणी जनावरे व परिसरात करावी. त्यामुळे डास, गोचीड व माशांची संख्या कमी होईल, अशी असे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. माने म्हणाले.

खासगी डॉक्टरांनी निडलबाबत काळजी घ्यावी
पशू वैद्यकीय विभागाने खासगी पशू वैद्यकीय डॉक्टरांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. एका गोठ्यातील निडल दुसरीकडे वापरू नये. कोठेही ‘लम्पी’चे जनावरे आढळल्यास त्याची माहिती तातडीने शासकीय पशू वैद्यकीय प्रशासनाला द्यावी, असे म्हटले आहे.

Back to top button