कोंभळी : वनविभाग हद्दीतील रस्त्याच्या कामाचे ग्रहण सुटले

कोंभळी : वनविभाग हद्दीतील रस्त्याच्या कामाचे ग्रहण सुटले
Published on
Updated on

योगेश गांगर्डे: 

कोंभळी : 2018 साली सुरू झालेल्या कोंभळी फाटा ते कर्जत रस्त्यात असलेल्या वनविभागाच्या परवानगीचे ग्रहण तब्बल तीन वर्षांनंतर सुटले असून, वनविभागाच्या हद्दीतील काम सुरू झाल्याने अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दैनिक 'पुढारी'नेही खडी फोडण्याची नव्हे, तर फोडलेल्या खडीची शिक्षा, 'काही महिन्यातच कोंभळी कर्जत रस्ता उखडला,' अशा विविध मथळ्याखाली अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या; अखेर प्रशासनाने त्याची दखल घेतली असल्याने या पाठपुराव्याला यश आले. यामुळे नागरिकांनी दैनिक 'पुढारी'चे आभार मानले.

माजी मंत्री राम शिंदे यांच्या कार्यकाळात हायब्रीड ऍन्युटी प्रकल्पाअंतर्गत कोंभळी फाटा ते कर्जत रस्त्याला मंजुरी देण्यात आली होती. रस्त्याचे काम सुरू होऊन तीन वर्षे उलटूनही रस्त्याचे काम अजूनही अर्धवट अवस्थेत आहे. 24 महिन्यांचा निविदा कालावधीही उलटून गेला आहे, अनेक ठिकाणी रस्त्याचे काम शेतकर्‍यांच्या तक्रारी, वनविभागाच्या परवानग्या यामध्ये अडकून पडले होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले कोंभळी फाटा ते कर्जत रस्त्याचे 30 किलोमीटरचे काम सहा महिन्यांपासून रखडले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी टाकलेली आहे. रस्ता उकरून ठेवलेला आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसामुळे वनविभागाच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूच्या उकरलेल्या मातीमुळे चिखल तयार होत आहे. या चिखलातून प्रवाशांना वाट काढणे मुश्किल होते. या मार्गावर रात्री-अपरात्री अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या मार्गावर वनविभागाची हद्द जवळपास 7.5 किलोमीटर लांबी असल्याने वन्य जीव, पर्यावरण, वन विभागाच्या परवानग्या घ्याव्या लागणार होत्या; मात्र काम सुरू होऊन तीन वर्षे उलटले, तरी परवानग्या न मिळाल्याने रस्त्याचे काम 'जैसे थे' राहिले. दरम्यान, तब्बल तीन वर्षांनंतर वनविभागाच्या परवानग्या मिळाल्या आहेत. त्याच रुंदीवर रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे, वनविभागाच्या हद्दीत रस्त्याची रुंदी 3.75 मीटर ते 5.50 मीटर दरम्यान असणार आहे. इतर ठिकाणी रस्त्याची रुंदी 10 जवळपास 10 मीटर आहे; मात्र वनविभागाच्या हद्दीत 'ती' रुंदी कमी करण्याचा घाट का घातला जात आहे? हा प्रश्न अनुत्तरित आहे. दरम्यान, वनविभागाच्या परवानग्या मिळाल्याने आहे, त्याच रुंदीवर डांबरीकरण होणार असल्याने खड्ड्यामधून प्रवास करणार्‍यांचा त्रास कमी होणार आहे. आता राहिलेले काम किती दिवसांत पूर्ण होते की, अजून रखडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोंभळी फाटा ते कर्जत रस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी आमदार रोहित पवार प्रयत्न करत होते. वनविभागाची परवानगी घेण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. अखेर त्या परवानग्या मिळल्याने आमदार पवारांचे आभार, तरच दैनिक 'पुढारी'ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले.
                                                            – सचिन दरेकर, माजी सरपंच, कोंभळी.

'मविआ' सरकार व कर्जत जामखेडचे आमदारांच्या धोरण लकवा आणि या भागाविषयीची अनास्थेमुळे वेळोवेळी पाठपुरावा करूनही तांत्रिक कारणे पुढे करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी चालढकल करत असल्याने हा रस्ता रखडला होता. राज्यात भाजप सेनेचे स्थापन झालेले सरकार आणि विधानपरिषदेमध्ये कर्जत-जामखेडला आमदार राम शिंदेंच्या रुपाने दिलेले प्रतिनिधित्वामुळे पुन्हा काम जोरात सुरू झाले. हा आमदार राम शिंदेंचा प्रशासकीय वचक आणि निर्णय क्षमतेचा परिणाम म्हणावा लागेल. दैनिक 'पुढारी'ने पाठपुरावा केल्याबद्दल आभार.
                                            – शेखर खरमरे, सरचिटणीस, भाजप, कर्जत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news